पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे खून प्रकरण: राजू पाटील याचा जामीन फेटाळला, दोघांना तात्पुरता जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 01:11 PM2023-04-03T13:11:29+5:302023-04-03T13:11:57+5:30
गेल्या साडेचार वर्षांपासून कारागृहात असलेल्या दोन्ही संशयितांना पहिल्यांदाच जामीन मंजूर
कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे खूनप्रकरणी अटकेत असलेले संशयित महेश मनोहर फळणीकर (रा. आजरा) आणि निलंबित पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर या दोघांना पनवेल जिल्हा न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला. तिसरा संशयित राजू पाटील याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
सध्या तळोजा कारागृहात असलेला संशयित महेश फळणीकर याचे वडील मनोहर लक्ष्मण फळणीकर यांचे आजरा येथे निधन झाले. त्यामुळे उत्तरकार्य विधीसाठी सात दिवसांच्या जामिनाची मागणी फळणीकर याच्या वकिलांनी पनवेल जिल्हा न्यायालयात केली होती. मात्र, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी ५ ते ७ एप्रिलदरम्यान तीन दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला.
या गुन्ह्यातील प्रमुख संशयित अभय कुरुंदकर याच्या मुलीचे लग्न २४ एप्रिलला कोल्हापुरात आहे. त्या लग्न समारंभास उपस्थित राहता यावे, यासाठी कुरुंदकर याने वकिलामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. त्यालाही २३ ते २५ एप्रिलदरम्यान तात्पुरता जामीन न्यायाधीशांनी मंजूर केला. विविध अटी आणि शर्तींनुसार दोन्ही संशयितांना जामीन मंजूर झाला आहे.
गेल्या साडेचार वर्षांपासून कारागृहात असलेल्या दोन्ही संशयितांना पहिल्यांदाच जामीन मंजूर झाला आहे. या गुन्ह्यातील तिसरा संशयित राजू पाटील यानेही जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायाधीशांनी पाटील याचा अर्ज फेटाळला, अशी माहिती संशयितांच्या वकिलांनी दिली.