जिल्हा परिषदेच्या ‘वॉटस् अॅप’वर तक्रारींचा पाऊस अधिकारी, कर्मचाऱ्यांची पोलखोल : तब्बल १७५ नागरिकांनी साधला संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:34 AM2018-09-11T00:34:42+5:302018-09-11T00:39:33+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेशी संंबंधित तक्रारी ‘वॉटस्अॅप’वरून करण्याच्या उपक्रमाला पहिल्याच आठवड्यात भरघोस प्रतिसाद मिळाला असून, यामुळे अधिकारी आणि कर्मचाºयांची पोलखोल होणार आहे.
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : जिल्हा परिषदेशी संंबंधित तक्रारी ‘वॉटस्अॅप’वरून करण्याच्या उपक्रमाला पहिल्याच आठवड्यात भरघोस प्रतिसाद मिळाला असून, यामुळे अधिकारी आणि कर्मचाºयांची पोलखोल होणार आहे. केवळ आठ दिवसांत १७५ नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधला आहे. यातील अनेकांनी गावातील तक्रारी केल्या असून, या निवारणासाठी आता स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत १२ तालुक्यांमध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून काम सुरू असते. विविध विकासकामांबाबत ग्रामस्थ, संघटना यांच्या तक्रारी असतात. त्या एकतर पोस्टाने, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेकडे द्याव्या लागतात. यामध्ये वेळ, श्रम आणि पैसा वाया जात असल्याची दखल घेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने ८६0५२७९९00 या वॉटस्अॅप क्रमांकावर तक्रारी स्वीकारण्यासाठी सुरुवात केली आहे.
गेल्या महिन्यात २८ तारखेला ही योजना सुरू केली गेली असली तरी प्रत्यक्षात ३ सप्टेंबरपासून ही योजना कार्यान्वित झाली आहे. तेव्हापासून सोमवार १0 सप्टेंबरपर्यंत केवळ ८ दिवसांत अनेक गावच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. अनेकांनी तक्रार करताना फोटोही टाकले आहेत. अनेक धोरणात्मक बाबींवरही या गु्रपवर विचारणा करण्यात येत आहे.
पाटगाव (ता. भुदरगड)कडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. बालिंगा येथील बीएसएनएल ते नवनाथ गु्रपपर्यंतचा रस्ता केवळ दोन महिन्यांत खराब झाला आहे. आजरा तालुक्यातील चितळे येथील अंतर्गत रस्त्यांमध्ये चिखल आणि दगडधोंडेच आहेत. तामगाव ग्रामपंचायत एकवेळच पाणी सोडते, अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत.
पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी एखादी बाब विचारल्यानंतर अनेकदा काहीतरी उत्तर देत वेळ मारून नेली जाते; परंतु आता वॉटस्अॅपवरच फोटो आणि तेथील परिस्थिती मांडली जाणार असल्याने थातूरमातूर उत्तरे देणाºया अधिकारी, कर्मचाºयांची पोलखोल होणार आहे.
एक वर्षानंतर उघडले घरपण आरोग्य उपकेंद्र
पंचायत राज समिती येणार असल्याच्या निमित्ताने पन्हाळा तालुक्यातील घरपण येथील आरोग्य केंद्र एक वर्षाने उघडले; याबद्दल अभिनंदन, अशी उपहासात्मक पोस्ट या ग्रुपवर टाकण्यात आली आहे. आता हे उपकेंद्र सुरू राहावे, असे आवाहन केले आहे.
निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक
सध्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हा वॉटस्अॅप ग्रुप हाताळला जातो. त्यावर ढीगभर तक्रारी, फोटो, अर्ज, निवेदने पडत आहेत.याचे वर्गीकरण करणे, शहानिशा करणे, संबंधित विभागाकडे ती तक्रार पाठविणे आणि त्यासाठीचे योग्य उत्तर देणे यासाठीची स्वतंत्र यंत्रणा आता उभी करणे गरजेचे बनले आहे.
अन्यथा ‘ही योजना कायम सुरू राहणार का’ हा याच ग्रुपवर विचारलेला प्रश्न अनाठायी नव्हता, असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण होईल.