नांगरे-पाटील यांच्याकडून पोलिसांची झाडाझडती
By admin | Published: July 22, 2016 12:42 AM2016-07-22T00:42:10+5:302016-07-22T00:51:33+5:30
ठाण्यांमध्ये उडाली भंबेरी : शाहूपुरी, लक्ष्मीपुरी ठाण्यांना भेटी
कोल्हापूर : पोलिस ठाण्यातील स्वच्छता, लोकाभिमुख सेवा, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांतील तपासाचे पुढे काय झाले, अशी विचारणा गुरुवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे केली. शाहूपुरी व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यांत सायंकाळी नांगरे-पाटील यांनी दूचाकीवरून अचानक भेटी दिल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी नांगरे-पाटील यांनी काहीना शाबासकी, तर काहीना कानपिचक्या दिल्या.
गेल्या आठवड्यात नांगरे-पाटील यांनी विशेष पोलिस महानिरीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर प्रथमच गुरुवारी शाहूपुरी पोलिस ठाण्याला भेट दिली. नांगरे-पाटील आल्याचे समजताच पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी पोलिस ठाण्यातून बाहेर आले.
त्यानंतर ते लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पोलिस ठाण्यात स्वच्छता आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी केली. सुमारे २० ते २५ मिनिटे नांगरे-पाटील यांनी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक युवराज आठरे यांच्याशी चर्चा केली व तपासाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी लक्ष्मीपुरी ठाण्यातील कॉन्स्टेबल अभिजित व्हरांबळे व अभिजित घाटगे यांना नांगरे-पाटील यांनी बक्षीस जाहीर केले. या दोघांनी घरफोडीतील संशयित गुन्हेगार उत्तम बारड याने केलेल्या गुन्ह्यांचा तपास कौशल्यरीत्या केला आहे.
अधिकाऱ्यांकडे
तपासाची विचारणा
त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात आवाराची, गुन्हे शोध पथक (डी. बी.) सह बिनतारी संदेश यंत्रणा, पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या केबिनची पाहणी केली. त्याचबरोबर पोलिस ठाण्यातील स्वच्छता, लोकभिमुख सेवा देता काय? अशी विचारणा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे केली. त्यानंतर प्रत्येक पोलिस गणवेशामध्ये आहे का? याचीही तपासणी केली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना गुन्ह्यांचा आढावा घेऊन पुढे याचा तपास काय झाला? अशी विचारणा केली.