खासगी वाहनावर 'पोलीस, प्रेस, आर्मी' लिहिताय, होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 04:54 PM2022-03-18T16:54:36+5:302022-03-18T16:55:43+5:30

‘पोलीस’ पाटी लावलेली वाहने नाकाबंदी तसेच सुरक्षा तपासणी न होता सोडली जाण्याची शक्यता असते, त्यामुळे पोलीस पाटीचा गैरवापर होऊन नागरिकांच्या जीवाला धोका पोहचू शकतो.

Police, press, army written on private vehicle, action will be taken | खासगी वाहनावर 'पोलीस, प्रेस, आर्मी' लिहिताय, होणार कारवाई

खासगी वाहनावर 'पोलीस, प्रेस, आर्मी' लिहिताय, होणार कारवाई

googlenewsNext

कोल्हापूर : बहुतेक पोलीस अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक हे त्यांच्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पाटी लावून चालवितात. याबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करून कारवाईचे निर्देश दिलेले आहेत, तरीही कोल्हापूर जिल्ह्यात हे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा पद्धतीने नावाची पाटी लावून बिनधास्त फिरणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

पोलिसांनी खासगी वाहनावर ‘पोलीस’ असे लिहिण्यास कायद्याने बंदी आहे. फक्त सरकारी पोलीस वाहनांवर ‘पोलीस’ असा नामोल्लेख करता येतो. ‘सर्व नागरिकांना समान कायदा’ या तत्त्वानुसार पोलिसांनीच कायद्याचे उल्लंघन करणे हे पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यासारखे आहे. अशा प्रकारे ‘पोलीस’ पाटी लावलेली वाहने नाकाबंदी तसेच सुरक्षा तपासणी न होता सोडली जाण्याची शक्यता असते, त्यामुळे पोलीस पाटीचा गैरवापर होऊन नागरिकांच्या जीवाला धोका पोहचू शकतो.

तसेच ‘पोलीस’ पाटी लावून अशाप्रकारे वाहनांमार्फत घातपात कृत्य होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे ज्यां पोलीस कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांच्या खासगी वाहनावर ‘पोलीस’ पाटी अगर पोलिसांचे चिन्ह अगर स्टिकर असतील तर ते काढून टाकावेत. अशा प्रकारची पोलीस पाटील किंवा पोलिसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स लावल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासन, प्रेस, आर्मी यांचीही तपासणी

सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी हे आपल्या खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन,भारत सरकार अशा पाट्या लावून उघडपणे फिरतात. अशा पाट्या लावता येणार नसल्याचे यापूर्वीच प्रादेशिक परिवहन खात्याकडून जाहीर केले आहे. त्याशिवाय आर्मी, प्रेस अशाही पाट्या वाहनावर नियमात बसत नसल्याने त्यांच्याही वाहनांची तपासणी करुन कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

परेडवेळी माहिती द्या

दोन्हीही सत्रातील परेडवेळी ‘पोलीस’ ही पाटी खासगी वाहनावर लावू नये यासाठी प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अवगत करावे अशाही सूचना अधीक्षक बलकवडे यांनी दिल्या आहेत.

Web Title: Police, press, army written on private vehicle, action will be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.