कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईच्या भीतीने दोघांच्या इमारतीवरून उड्या; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 11:35 AM2023-06-19T11:35:13+5:302023-06-19T11:35:21+5:30
दगडावर डोके आपटल्याने जागीच मृत्यू झाला
कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील एका दुमजली इमारतीच्या दूसऱ्या मजल्यावर सहाजण जुगार खेळत असल्याचे समजल्याने रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीवरून उड्या मारल्या, त्यात साहील मायकेल मिणेकर (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाला. त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राजेंद्र नगर येथील एका दुमजली इमारतीत सहाजण जुगार खेळत असल्याची माहिती रविवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिस अकरा वाजण्याच्या सुमाराला तेथे पोहोचले असता कारवाईच्या भीतीने साहिल आणि दत्तात्रय यांनी उड्या मारल्या. इमारती खाली असलेल्या दगडावर डोके आपटल्याने साहिलचा जागीच मृत्यू झाला.
शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह सीपीआरमध्ये आणण्यात आला. तर दत्तात्रय याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साहिल हा खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
सीपीआरच्या आवारात गर्दी
साहिलचा मृत्यू झाल्याचे कळताच राजेंद्रनगर येथील तरुणांनी आणि नातेवाईकांनी सीपीआरच्या आवारात गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीयांनी येथे हंबरडा फोडला.
पोलिस बंदोबस्त
गर्दी वाढल्याने सीपीआरच्या शवविच्छेदन विभागाच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सतीश गुरव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.