सरकारची प्रतिमा जपताना पोलिसांची तारांबळ
By admin | Published: June 8, 2017 01:09 AM2017-06-08T01:09:23+5:302017-06-08T01:09:23+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नी सुकाणू समितीची निदर्शने : आंदोलक ताब्यात; दडपशाही कराल तर त्याच भाषेत उत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करू न दिल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. सरकारची प्रतिमा जपताना पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
अल्पभूधारकांना कर्जमाफीचे गाजर दाखवून सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडत असून ‘सरसकट कर्जमाफी देता येत नसेल तर खुर्ची सोडा,’ असा इशारा यावेळी समितीच्यावतीने देण्यात आला. कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेले सात दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढत असून, शेतकरी आक्रमक झाले आहेत. सर्वपक्षीय सुकाणू समितीच्यावतीने शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करीत सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचे नियोजन होते. शेकापच्या कार्यालयात हा पुतळा तयार करण्यात आला. तो घेऊन शिवाजी रोडवरून दोन आंदोलक मोटारसायकलवरून घेऊन आले; परंतु पोलिसांनी त्यांना गाडीवरून उतरूच दिले नाही. त्यांच्याकडून हा पुतळा पोलिसांनी हिसकावून घेतला. त्यावेळी कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली.
हा पुतळा घेऊन पुढे गर्दीतून वाट काढत धावणारे पोलीस व त्यांच्या मागे कार्यकर्ते असे चित्र तिथे दिसले. पोलिसांनी हा पुतळा केएमटी बसमधून लगेच पसार केला व सरकारच्या प्रतिमेची जपणूक केली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने शिवाजी चौक दणाणून गेला. आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
राज्यातील शेतकरी एकसंध झाल्याने सरकार अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे आंदोलनात फूट पाडण्याचे पाप सुरू असल्याचा आरोप करीत माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, ‘अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन हे फसवे आहे. त्यातून शेतकऱ्यांचे भले होणार नाही. सात दिवस झाले आंदोलन सुरू असताना सरकार बहिरे असल्यासारखे वागत आहे; पण लक्षात ठेवा गाठ शेतकऱ्यांशी आहे. पोलिसांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका नाही तर आम्हालाही त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल.’
‘माकप’चे चंद्रकांत यादव म्हणाले, सरकारचा खरा चेहरा आता शेतकऱ्यांसमोर आला आहे. निवडणुकीत घोषणा करायच्या आणि पाच वर्षे सत्ता भोगायची, ही भाजपची जुनी पद्धत आहे. सरकारची दडपशाही खपवून घेणार नसून, शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. नाही तर पेशवाईवर हल्लाबोल करावा लागेल. यावेळी किसान सभेचे प्रा. उदय नारकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, अॅड. माणिक शिंदे, बाबासाहेब देवकर, अतुल दिघे, सुभाष निकम, भारत पाटील, एम. डी. निश्चिते, संभाजी जगदाळे, जनार्दन पाटील, जगन्नाथ कांदळकर, गिरीष फोंडे, आदी उपस्थित होते.
चंद्रकांतदादांच्या घराला छावणीचे स्वरूप
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून पुढचा टप्पा म्हणून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा दिलेल्या इशाऱ्याचा पोलीस प्रशासनाने चांगलाच धसका घेतला. बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर, नाळे कॉलनी येथील घराला पोलिसांनी अक्षरश: वेढा घातला होता.
शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, यांसह विविध मागण्यांसाठी १ जूनपासून राज्यभरातील शेतकरी संपावर आहेत. मोर्चे, टाळे ठोक आंदोलनानंतरही सरकार दखल घेत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर येथील नाळे कॉलनीतील घराला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिला होता. सकाळी आठ वाजल्यापासून सुमारे २५-३० पोलिसांची कुमक रवाना करण्यात आली होती. मंत्री पाटील यांच्या घराकडे येण्यासाठी तीन रस्ते आहेत. प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर चार-पाच पोलीस उभे होते, तर घराच्या दारातही तितकेच पोलीस उभे होते.
शिवाजी चौकातील आंदोलन झाल्यानंतर कदाचित आंदोलनकर्ते संभाजीनगरकडे रवाना होतील, असा पोलिसांचा अंदाज होता, त्यामुळे तेथूनच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले तरीही इतर कार्यकर्ते घराकडे येतील, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क होती.
शिवसेनेने प्रामाणिकता सिद्ध करावी
शिवसेना व भाजपमध्ये मतभेद असल्याचे दाखवत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने पाठिंबा दिला असला तरी त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात बाहेर पडले पाहिजे. अन्यथा, शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची भावना राज्यात निर्माण होईल. शिवसेनेला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी हीच वेळ असल्याचे संपतराव पवार यांनी सांगितले.