Kolhapur: पोलिस भरती एका गुणाने हुकली; नैराश्यातून तरुणाने जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 11:59 AM2024-05-17T11:59:31+5:302024-05-17T12:00:02+5:30
कोल्हापूर : वर्षभरापूर्वी झालेल्या पोलिस भरतीत अवघ्या एका गुणाने संधी हुकल्याने जयेंद्र शंकर पाटील (वय २६, रा. सडोली दुमाला, ...
कोल्हापूर : वर्षभरापूर्वी झालेल्या पोलिस भरतीत अवघ्या एका गुणाने संधी हुकल्याने जयेंद्र शंकर पाटील (वय २६, रा. सडोली दुमाला, ता. करवीर) याने तणनाशकाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. पोलिस भरतीचे उद्दिष्ट ठेवलेला जयेंद्र अपयशाने नैराश्यात होता. मंगळवारी (दि. १४) त्याने राहत्या घरात इंजेक्शन घेतले होते. उपचारादरम्यान गुरुवारी (दि. १६) सकाळी त्याचा मृत्यू झाला. जीव वाचला असता तर आणखी दहा परीक्षा देता आल्या असत्या; परंतु तसा विचारच न केल्याने एक उमदे आयुष्य उमलता उमलता कोमेजून गेले. हाताशी आलेल्या मुलाने अशा पद्धतीने जीवन संपवल्याने कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला.
सडोली दुमाला येथील जयेंद्र पाटील याने पदवीचे शिक्षण घेतले होते. गेल्या सहा वर्षांपासून तो पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत होता. गेल्यावर्षी झालेल्या भरती प्रक्रियेत अवघ्या एका गुणाने त्याची संधी हुकली. त्यानंतर तो नैराश्यात होता. मित्र आणि नातेवाइकांनी अनेकदा त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नैराश्यातून बाहेर आला नाही. मंगळवारी सकाळी त्याने दंडात तणनाशकाचे इंजेक्शन टोचून घेतले. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी त्याला तातडीने कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तीन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते.
मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अपयशातून टोकाचा निर्णय घेतल्याने त्याचे कुटुंबीय आणि मित्रांना धक्का बसला. जयेंद्र याच्या पश्चात आई, वडील, बहीण, चुलते, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.