मोदी यांचा पुतळा दहन करताना पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:50+5:302021-05-27T04:24:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी आंदोलन बेदखल व कोरोना नियंत्रणात अपयश आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी आंदोलन बेदखल व कोरोना नियंत्रणात अपयश आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना बुधवारी बिंदू चौकात कार्यकर्ते व पोलिसांत जोरदार झटापट झाली. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले. या चौकाला पोलिसांनी सकाळपासून कडे केले होते. शिवसेनेसह काॅंग्रेस, राष्ट्रवादी व डाव्या पक्षांच्यावतीने काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत असून, त्याला बुधवारी (दि. २६) सहा महिने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेऊन सात वर्षे पूर्ण झाली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी विविध बारा पक्षांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा दहन करण्याचे नियोजन कार्यकर्त्यांचे होते. त्यामुळे सकाळपासूनच पोलिसांनी बिंदू चौकाला कडे केले होते. जसजसे आंदोलनकर्ते येऊ लागले तसे पोलिसांनी अधिकच कडे केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरु असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या गाडीतून पुतळा आणण्यात आला. यावेळी भाषणे थांबवून सगळेच गाडीकडे पळत सुटल्याने पोलीस यंत्रणा चांगलीच हडबडली. पोलिसांनी गाडीसभोवती घेराओ घालत गाडीतून पुतळा काढून घेतला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, गेल्या सात वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कष्टकरी व कामगारांना संपविण्याचे काम केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात त्यांच्याविरोधात रोष आहे, त्यांचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आलो आहोत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, गुंडशाही व झुंडशाही संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा दहन करण्याचा आम्ही निर्णय घेतला. या देशात लोकशाही संपुष्टात आली असून, पोलिसांनीही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली असून, त्यांचा आम्ही निषेध करतो. आता बारा पक्ष एकत्र आलो असून, यापुढे आम्हाला हत्तीचे बळ मिळणार आहे. मोदींनी दिल्लीच्या तख्तावरुन खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
किसान सभेचे नामदेव गावडे म्हणाले, मोदी यांच्या एकाधिकारशाहीला देशातील जनता कंटाळली असून, त्यामुळे पश्चिम बंगाल, केरळसह इतर राज्यांत पराभव पत्करावा लागला. आता उत्तरप्रदेश व पंजाबमध्ये तेथील जनता त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. यावेळी ‘माकप’चे चंद्रकांत यादव, ॲड. गुलाबराव घोरपडे, सतीशचंद्र कांबळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. अतुल दिघे, दिलीप पवार, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, संभाजीराव जगदाळे, रघुनाथ कांबळे, रवी जाधव, संदीप देसाई, कुमार जाधव, राजू जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.
‘नरेंद्र मोदी... किसान विरोधी’ घोषणा
पोलिसांनी पुतळा काढून घेतल्यानंतर आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांचा निषेध नोंदवत ‘नरेंद्र मोदी... किसान विरोधी’ या घोषणांनी बिंदू चौक दणाणून सोडला.