कोल्हापुरात मोदी यांचा पुतळा दहन करताना पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:53+5:302021-05-27T04:24:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी आंदोलन बेदखल करणे तसेच कोरोना नियंत्रणात अपयश आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी आंदोलन बेदखल करणे तसेच कोरोना नियंत्रणात अपयश आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करताना बुधवारी बिंदू चौकात कार्यकर्ते व पोलिसांत जोरदार झटापट झाली. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले. या चौकाला पोलिसांनी सकाळपासून कडे केले होते. शिवसेनेसह काॅंग्रेस, राष्ट्रवादी व डाव्या पक्षांच्या वतीने काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत असून, त्याला बुधवारी (दि. २६) सहा महिने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेऊन सात वर्षे पूर्ण झाली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी विविध बारा पक्षांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यासाठी सकाळपासूनच पोलिसांनी बिंदू चौकाला कडे केले होते. जसजसे आंदोलनकर्ते येऊ लागले, तसे पोलिसांनी अधिकच कडे केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या गाडीतून पुतळा आणण्यात आला. यावेळी भाषणे थांबवून सगळेच गाडीकडे पळत सुटल्याने पोलीस यंत्रणा चांगलीच हडबडली. पोलिसांनी गाडीसभोवती घेराओ घालत गाडीतून पुतळा काढून घेतला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.