कडक लॉकडाऊनसाठी पोलीस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:23 AM2021-05-16T04:23:37+5:302021-05-16T04:23:37+5:30
कोल्हापूर : लॉकडाऊनकरिता शनिवारी मध्यरात्रीपासूनच पोलीस प्रशासनाने कडक कारवाईची अंमलबजावणी सुरू केली. प्रमुख रस्त्यांवर, चौकात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात ...
कोल्हापूर : लॉकडाऊनकरिता शनिवारी मध्यरात्रीपासूनच पोलीस प्रशासनाने कडक कारवाईची अंमलबजावणी सुरू केली. प्रमुख रस्त्यांवर, चौकात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. रात्रीपासूनच रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई व वाहने जप्तीची मोहीम पोलिसांनी सुरू केली. विशेष म्हणजे, पावसाने हजेरी लावल्यामुळे रस्त्यावरून क्वचितच वाहने फिरताना दिसत होती, पण त्यांनाही पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी मध्यरात्रीपासून कडक लाॅकडाऊन लागू केला आहे. यामध्ये दूध व औषध दुकाने वगळता सर्वच बंद राहणार आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्यांनाही अटकाव करण्यात येत आहे. रोज सकाळी सकाळी ६ ते ११ त्या त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हद्दीत फिरती करून बंदोबस्तावर नजर ठेवणार आहेत. सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर हद्दीतील बंदोबस्तावर पहाणीची संपूर्ण जबाबदारी असेल. त्यानंतर सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत हद्दीतील पोलीस अधिकारी बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. अशा तीन टप्प्यात सुमारे ३५०० पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे जवानही तैनात केले आहेत.
जिल्हा प्रवेशाच्या १७ मार्गांवर ‘आरटीपीसीआर’ सक्तीची
जिल्ह्यात प्रवेशणाऱ्या १७ मार्गांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या ठिकाणाहून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला ई-पासशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. तसेच रात्रीच त्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीची करण्यात येत होती. यातील आंतरजिल्हा व आंतरराज्य तपासणी नाक्यावर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
(फोटो उशीरा सचीन भोसले देत आहे...)