पोलिसांनी फिरवली पाठ अन् बागेची लागली वाट
By admin | Published: February 10, 2015 11:19 PM2015-02-10T23:19:29+5:302015-02-10T23:52:32+5:30
मुरगूड पोलीस ठाण्याच्या आवारातील स्थिती : लोकसहभागातून उभारलेली बाग नष्ट होण्याच्या मार्गावर
मुरगूड : मुरगूड पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या समोरील बाजूस तत्कालीन अधिकारी व पोलिसांनी लोकसहभागातून उभा केलेली सुसज्ज बाग पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असताना शासनाच्याच अधिपत्याखाली काम करणाऱ्या अधिकारी व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झाडेच नाहीशी होण्याची वेळ आल्याने पोलीस ठाण्यासमोरील बागेची अवस्था ‘पोलिसांनी फिरविली पाठ अन् बागेची लागली वाट’ अशीच झाली आहे. मुरगूडचे पोलीस ठाणे स्थापनेपासून गावभागामध्ये असणाऱ्या जुन्या छोट्याशा इमारतीमध्येच होते. शासनदरबारी प्रयत्न झाल्याने सहा वर्षांपूर्वी पोलीस कॉलनीच्या विस्तीर्ण जागेमध्ये सुसज्ज इमारत उभा राहिली आणि लागलीच पोलीस ठाण्याचा बिस्तारा नवीन इमारतीमध्ये हलविला गेला. इमारतीच्या आजूबाजूला ओसाड प्रदेश असल्याने सुने-सुने अशीच अवस्था ठाण्याची होती; पण त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे दत्तात्रय भापकर यांनी ठाण्याच्या इमारतीच्या बाजूला बगिचा निर्माण करण्याचा संकल्प केला.
सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना विचारात घेऊन शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आवाहन करून त्यांनी बगिचा करण्यास सुरुवात केली. सुरू असलेले काम पाहून स्वखुशीने शहरातील काही लोकांनी माती आणण्याचे काम केले. काहींनी शोभेची झाडे, फळझाडे, काहींनी मोफत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला. सर्वांच्या सहकार्याने ओसाड दिसणारा प्रदेश अगदी हिरवाईने नटून गेला. तसेच कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी पालिकेने पाण्याचे कनेक्शन दिले. जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी चोहोबाजूंनी संरक्षक कुंपणही उभा केले; पण गेल्या काही महिन्यांपासून बागेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने बागेतील झाडे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. कुंपणही गायब झाले आहे. पाणी न मिळाल्याने फळझाडे, फुलझाडे वाळून गेली आहेत. कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. बागेतील गवत गुडघ्यापर्यंत वाढले आहे. कहर म्हणजे बागेतील गवत नाहीसे करण्यासाठी आग लावली. आणखी काही दिवस दुर्लक्ष झाले तर ही बाग येथे होती यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. कायद्याच्या कचाट्यातून थोडेसे बाजूला होऊन आपण या ठिकाणी काम करतो आहे ते ठिकाण चांगले करण्यासाठी थोडासा वेळ काढून सध्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बागेकडे लक्ष दिल्यास आहे त्यापेक्षा नक्कीच एक डौलदार बाग निर्माण होईल, अशीच आशा यानिमित्ताने बाळगूया.