अंबाबाई मंदिरात बेवारस बॅगचा पोलिसांकडून शोध
By admin | Published: September 25, 2016 01:10 AM2016-09-25T01:10:42+5:302016-09-25T01:10:42+5:30
रंगीत तालीम : सतर्कता पाहणी
कोल्हापूर : वेळ शनिवार अकराची... जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख पोलिसांचा फौजफाटा बोलावितात. ‘अंबाबाईच्या मंदिरात बेवारस वस्तू असल्याची बातमी आहे... ती शोधून काढा,’ अशा सूचना करतात. चार अधिकाऱ्यांसह ३५ कर्मचाऱ्यांनी आॅपरेशनला सुरुवात केली. मंदिराच्या आतील व बाहेरील परिसर पिंजून काढला. अखेर दीड तासाने महाकाली मंदिराजवळील देवीच्या पालखीमध्ये ती बेवारस पिशवी मिळून आली. ती उघडली असता त्यामध्ये नारळ दिसताच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.
सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदाच्या नवरात्रौत्सवाचे शिस्तबद्ध नियोजन करून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिस प्रशासनास दिले आहेत. मंदिर जुना राजवाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये आहे. त्यामुळे येथे कार्यरत असणारे पोलिस किती सतर्क व दक्ष आहेत, याची चाचपणी करण्यासाठी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी तांबड्या पिशवीमध्ये नारळ ठेवून ती महाकाली मंदिराजवळील पालखीमध्ये ठेवली. त्यानंतर पोलिस ठाण्यात येऊन त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ बोलावून घेतले. काही कर्मचारी पेट्रोलिंगसाठी, तर काही नोटिसा देण्यासाठी बाहेर गेले होते. अचानक निरोपाचे फर्मान आल्याने सर्वच भांबावून गेले.
देशमुख यांनी ‘अंबाबाई मंदिर परिसरात बेवारस वस्तू असल्याची बातमी आहे. ती शोधून काढा’ अशा सूचना दिल्या. चार अधिकारी व ३५ कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता वस्तूचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही भाविक पोलिसांचे आॅपरेशन पाहतच उभे राहिले; तर काहींनी कुतूहलापोटी काय झाले म्हणून पोलिसांकडे विचारपूस केली. मंदिराच्या आतील कोपरान् कोपरा पोलिसांनी पिंजून काढला. अखेर महाकाली मंदिराजवळ देवीची पालखी ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये बेवारस पिशवी मिळून आली. त्यामध्ये नारळ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ती देशमुख यांच्यासमोर ठेवली. पोलिसांची सतर्कता पाहून देशमुख यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)