पोलिसांनी तपासामध्ये हात झटकले की टेकले?

By admin | Published: January 18, 2016 12:00 AM2016-01-18T00:00:27+5:302016-01-18T00:33:29+5:30

डॉक्टर कुलकर्णी खून प्रकरण : आज इस्लामपूर बंद; सीआयडीकडे तपास देण्याची मागणी

The police shook hands in the check? | पोलिसांनी तपासामध्ये हात झटकले की टेकले?

पोलिसांनी तपासामध्ये हात झटकले की टेकले?

Next

अशोक पाटील -- इस्लामपूर -डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्यांची पत्नी डॉ. अरुणा कुलकर्णी यांच्या खुनामागचे मुख्य सूत्रधार मोकाटच असल्याचा दावा काही संघटनांनी केला आहे. पोलिसांची भूमिका पाहता, या तपास प्रकरणात त्यांनी हात झटकले, की टेकले? असा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे या खून प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत व्हावा, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. यासाठी सोमवार १८ रोजी इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली आहे.डॉ. कुलकर्णी दाम्पत्य खून प्रकरणाला १ महिना लोटला तरी, खुनातील मुख्य सूत्रधार सापडलेले नाहीत, असा संशय काही संघटनांनी व्यक्त केला आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी तपासासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे कैफियत मांडली आहे. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा काही संशयितांना ताब्यात घ्यावे लागले. परंतु पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. या प्रकरणात सध्या पोलिसांनी मौन पाळले असल्याने, त्यांना विविध संघटनांच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे.
खून प्रकरणातील संशयित तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या तिघांपलीकडे पोलिसांचा तपास सरकलेला नाही. त्यामुळे शहरातील काही संघटनांनी एकत्र येऊन, हा तपास सी.बी.आय.कडे द्यावा अशी मागणी केली आहे. यासाठीच सोमवारी बंदची हाक देण्यात आली आहे. सोमवारी होणाऱ्या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाडिक युवा मंच, एन.एस.यु.आय., वैद्यकीय व्यावसायिक संघटना, आर.पी.आय. यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
शहरातील बाजारपेठा ओस पडल्या आहेत. दिवसाढवळ्या महिलांचे दागिने लुटले जात आहेत. चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सावकारीतून झालेल्या आत्महत्या हा वाळवा तालुक्याला लागलेला कलंकच मानावा लागेल. तसेच सकाळी फिरावयास गेलेल्या रमेश शेटे या व्यापाऱ्यावर विष प्रयोग करुन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न याच इस्लामपुरात झाला. याचाही तपास ठप्पच आहे. या प्रकरणावर कोणीही आवाज उठविला नाही. गेल्या दोन महिन्यात गुन्हेगारी फोफावली आहे. या गुन्हेगारीपुढे पोलीस हतबल झाले आहेत. इस्लामपूर बंद ठेवणे हा पर्याय असू शकत नाही. यासाठी इस्लामपूर पोलीस ठाण्यात खमका पोलीस अधिकारी येणेच गरजेचे आहे.


वैशाली शिंदेंना हवी बदली
इस्लामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर दोन महिने सर्वकाही आलबेल चालले होते. त्यामुळे शांतता असलेल्या तालुक्यात आपली बदली झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. परंतु गेल्या तीन ते चार महिन्यात वाळवा, शिराळा तालुक्यात गुन्हेगारीने अक्षरश: कळस गाठला आहे. एकापाठोपाठ एक गुन्हे घडत असल्याने आता त्यांना शांत भागात बदली हवी आहे.



डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याच्या खुनाची शहरात घडलेली बाब निंदनीय आहे. या घटनेचा पोलिसांकडून योग्य तपास झालेला नाही. त्यामुळे शहरातील विविध संघटनांनी पुकारलेला बंद हा योग्यच आहे. त्याला माझा वैयक्तिक पाठिंबा राहील.
- सुभाष सूर्यवंशी, नगराध्यक्ष, इस्लामपूर.

Web Title: The police shook hands in the check?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.