पोलिस ठाण्यांचा केला पंचनामा
By admin | Published: July 24, 2014 11:44 PM2014-07-24T23:44:19+5:302014-07-24T23:47:50+5:30
मनोजकुमार शर्मा : कर्मचाऱ्यांना सुनावले खडे बोल
एकनाथ पाटील - कोल्हापू, ेभ्रष्टाचार, खून, मारहाण, घरफोड्या आदी घटनांमध्ये पोलिसांचा सहभाग वाढू लागल्याने कोल्हापूर पोलीस दलाची बदनामी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांचा ‘पंचनामा’ पोलिस अधिक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सुरू केला आहे.
जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असताना एकीकडे लाचखोर पोलिसांची संख्याही वाढत आहे. करवीर पोलिसांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक मटका बुकीचालकांना अटक केली. मटक्यामध्ये सक्रिय असलेल्या गल्लीपासून मुंबईपर्यंतच्या टोळीचा त्यांनी पर्दाफाश केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल क्राईम बैठकीत डॉ. शर्मा यांनी करवीर पोलीस ठाण्याला ‘आदर्श पोलीस ठाणे’ पुरस्काराने सन्मानित केले तर दुसऱ्या बाजूला हद्दीमधील दहा ते बारा मटकाचालकांना करवीर पोलिसांनी अटक केल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे प्रमुख धन्यकुमार गोडसे यांना सक्त सूचना केल्या. त्यानंतर गोडसे यांनी शाहूपुरी हद्दीमध्ये क्रिकेट बेटिंग व खुनाचा उलगडा केला. त्यानंतर कागल, करवीर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस लाच घेताना जाळ्यात सापडले तर मुरगूड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने स्वत:च्याच पत्नीचा खून केल्याचे उघडकीस आले. गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे यांना करवीर पोलिसांनी केलेली मारहाण आदी घटनांमुळे पोलिसांची जिल्ह्यात बदनामी झाली.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही घेतलेल्या क्राईम बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांना जनतेशी योग्यप्रकारे वागण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षकांनी जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांचा दौरा सुरू केला आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल, करवीर येथील पोलीस ठाण्यांचा त्यांनी ‘पंचनामा’ केला. अवैध धंद्यांवर वचक ठेवा, पोलीस ठाण्यात येणाऱ्या गोर-गरीब लोकांना न्याय द्या, चेन स्नॅचिंग, घरफोड्या थांबवा, कोल्हापूर पोलीस हे ‘नंबर वन’ आहेत याचे भान ठेवा, एखादा प्रश्न सोडविण्यामध्ये चालढकल केल्यास खपवून घेणार नाही, अशा कडक शब्दांत सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना त्यांनी सुनावले.
४कोणत्याही कामासाठी एक पैसाही कुणाकडून घेतला जाणार नाही आणि दिला जाणार नाही. प्रामाणिकपणा हीच माझ्या गेल्या सेवेची सर्वांत जमेची बाजू आहे.
४ती जपण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे असताना जेव्हा तुम्ही लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडता तेव्हा माझी प्रतिमा खराब होते.
४भ्रष्टाचार थांबवा, अन्यथा घरचा रस्ता पकडा, असे खडे बोल डॉ. शर्मा यांनी करवीर पोलिसांना सुनावले.