रात्रीच्यावेळी पोलीस पुन्हा रस्त्यावर : आजपासून शहरात संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 11:11 AM2020-12-22T11:11:23+5:302020-12-22T11:12:53+5:30
CoronaVirus Kolhapur Police- कोरोनाला पिटाळून लावण्यासाठी पोलिसांनी अहोरात्र रस्त्यावर राहून ड्यूटी बजावली होती; पण आज, मंगळवारपासून पंधरा दिवस शहरात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.
कोल्हापूर : कोरोनाला पिटाळून लावण्यासाठी पोलिसांनी अहोरात्र रस्त्यावर राहून ड्यूटी बजावली होती; पण आज, मंगळवारपासून पंधरा दिवस शहरात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे, त्यानिमित्त प्रत्येक पोलीस ठाण्यातील सुमारे एकतृतीयांश पोलीस बंदोबस्त हा रात्रीच्यावेळी रस्त्यावर राहणार आहेत, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.
ख्रिसमस सण व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर नागरिकांनी गर्दी करू नये. अन्यथा कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका उद्भवणार आहे. त्यामुळे दक्षता म्हणून राज्यभर महानगरपालिका हद्दीत रात्रीच्यावेळी सलग पंधरा दिवस संचारबंदी पुकारली आहे.
त्याच पार्श्वभूमीवर शहरातील चार पोलीस ठाण्यातील दैनंदिन पोलीस बंदोबस्तापैकी एकतृतीयांश पोलीस हे बंदोबस्तासाठी रात्रीच्यावेळी रस्त्यावर थांबून ड्यूटी बजावणार आहेत. त्यामुळे आज, मंगळवारी रात्रीपासून पोलीस रस्त्यांवर बंदोबस्तासाठी दिसणार आहेत.