पोलिस उपनिरीक्षकाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू, कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात घडली घटना

By उद्धव गोडसे | Published: December 16, 2023 07:18 PM2023-12-16T19:18:07+5:302023-12-16T19:19:44+5:30

चार दिवसात दुसऱ्या अधिकाऱ्यास त्रास

Police sub-inspector dies of cardiac arrest , The incident took place in Kolhapur Superintendent of Police office | पोलिस उपनिरीक्षकाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू, कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात घडली घटना

पोलिस उपनिरीक्षकाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू, कोल्हापूर पोलिस अधीक्षक कार्यालयात घडली घटना

कोल्हापूर : पोलिस अधीक्षक कार्यालयात वाचक शाखेत कार्यरत असलेले प्रतापराव जगन्नाथ भुजबळ (वय ५४, मूळ रा. अंगापूर, जि. सातारा, सध्या रा. पोलिस क्लब, मुख्यालय, कोल्हापूर) यांना शनिवारी (दि. १६) दुपारी साडेबाराच्या सुमारास कर्तव्यावर असताना छातीत दुखू लागले. काही वेळातच ते कार्यालयात कोसळले. बेशुद्धावस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, उपनिरीक्षक प्रतापराव भुजबळ वाचक शाखेत कार्यरत होते. राज्यपाल रमेश बैस आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या कोल्हापूर दौ-याच्या बंदोबस्त तयारीची लगबग सध्या पोलिस दलात सुरू आहे. याच गडबडीत असताना शनिवारी दुपारी उपनिरीक्षक भुजबळ यांच्या छातीत दुखू लागले. अस्वस्थ वाटू लागल्याचे त्यांनी सहका-यांना सांगितले. मात्र, काही वेळातच ते कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पुन्हा त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर खासगी रुग्णालयातून त्यांना सीपीआरमध्ये हलवण्यात आले. सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह भुजबळ यांच्या मूळ गावी पाठविण्यात आला. भुजबळ यांचे लहान बंधू विकास भुजबळ हे कोल्हापुरात पोलिस निरीक्षक आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. उपनिरीक्षक भुजबळ यांच्या निधनाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे-पाटील, शहर उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक तानाजी सावंत, सतीशकुमार गुरव, अविनाश कवठेकर यांनी सीपीआरमध्ये धाव घेऊन भुजबळ कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Web Title: Police sub-inspector dies of cardiac arrest , The incident took place in Kolhapur Superintendent of Police office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.