राजू शेट्टींना पोलिसांनी घरातून घेतलं ताब्यात; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 10:34 IST2025-03-15T10:33:46+5:302025-03-15T10:34:58+5:30
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार होते.

राजू शेट्टींना पोलिसांनी घरातून घेतलं ताब्यात; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
Raju Shetty: नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते उदगाव बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई देण्याच्या मागणीसाठीचे आंदोलन आणखी आक्रमक करण्यात आले आहे. या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु या आंदोलनाआधीच पोलीस प्रशासनाने राजू शेट्टी यांना त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेते दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच पोलीस राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच शेट्टी यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. तसंच शेतकरी संघटनेच्या इतर काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
नेमकी काय आहे शेतकऱ्यांची मागणी?
नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील चोकाक ते अंकली बाधित गावांतील उदगांव व उमळवाड येथे सोमवारी आणि मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मोजणी करणार आहे. परंतु बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावर होणारा मार्ग कसा असा असावा, यासंदर्भात आमच्याशी चर्चा करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.