सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ‘त्या’ गाडीच्या मागावर पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:17 AM2020-12-27T04:17:43+5:302020-12-27T04:17:43+5:30

सोमवारी मध्यरात्री मोबाईल व गांजाचे गठ्ठे कारागृहात फेकणारे दोन युवक व एक पांढरे चारचाकी वाहन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. पुढे ...

Police on the trail of 'that' vehicle through CCTV cameras | सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ‘त्या’ गाडीच्या मागावर पोलीस

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ‘त्या’ गाडीच्या मागावर पोलीस

Next

सोमवारी मध्यरात्री मोबाईल व गांजाचे गठ्ठे कारागृहात फेकणारे दोन युवक व एक पांढरे चारचाकी वाहन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. पुढे हे वाहन कळंबा नाक्यापासून देवकर पाणंद व गंगावेशकडे गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळले. गंगावेशपर्यंत अंतिम लोकेशन मिळते. त्यामुळे त्याच परिसरातील लॉजचा आधार घेऊन संशयित रात्री तेथे थांबले असल्याची शक्यता आहे. त्यादूष्टीने गंगावेश व रंकाळावेश स्टँड परिसरातील लॉजवरील माहिती संकलनाचे काम सुरू आहे. हे वाहन दुसऱ्या दिवशीही राष्ट्रीय महामार्गावरून पुढे गेल्याची शक्यता गृहीत धरून किणी व कोगनोळी टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजही तपासणी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

मोबाईल टॉवरआधारे कॉल तपासणी

मोबाईल कारागृहात फेकले, त्या घटनेदरम्यान कारागृह परिसरातून झालेल्या सर्व कॉल डिटेलच्या तपासणीचे काम सुरू आहे. त्यासाठी कारागृह परिसरातील मोबाईल टॅावरची मदत घेण्यात येत आहे. त्यातून संशयास्पद कॉलची चौकशी होणार आहे. कारागृहातील पाच अधिकारी व अकरा कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहभागाची शक्यता

कैद्यांना ठेवलेल्या बराक व संरक्षण भिंत यांच्यात जास्त अंतर आहे, तेथे कैदी सहजासहजी पोहोचू शकत नाहीत. तरीही भिंतीपलीकडे जागेत मोबाईल फेकणे व ते कोणाच्या माध्यमातून कैद्यांपर्यंत पोहोचविणार याची साखळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस चौकशी करत आहेत.

मोबाईल लपविण्यासाठी साहित्य

कारागृहात फेकलेल्या गठ्ठ्यामध्ये मोबाईलसह ‘व्ही-सील’ होते. व्ही-सील प्लास्टिक पिशवीला लावून त्यात मोबाईल ठेवून तो पॅकबंद करून पाण्यात लपवून ठेवता येतो. यापूर्वी कारागृहातील शौचालयाच्या फ्लश टँकमध्ये, पाण्याच्या टाकीत असे मोबाईल सापडले आहेत.

Web Title: Police on the trail of 'that' vehicle through CCTV cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.