शहरातील पोलीस ठाण्यांची ‘झाडाझडती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 08:41 PM2019-11-02T20:41:35+5:302019-11-02T20:43:03+5:30
काही अधिकाऱ्यांची कामकाजामध्ये प्रगती दिसून येत नसल्याने त्यांची थेट कानउघाडणी केली. पोलीस ठाणे परिसर फिरुन स्वच्छतेची माहिती घेतली. अचानक भेटीने काहीजणांच्या चेहºयावर तणाव व भीती दिसत होती.
कोल्हापूर : वर्षभरात किती गुन्हे दाखल झाले, किती उघडकीस आले, पोलीस ठाण्याचे कामकाज अद्ययावत आहे का, हद्दीमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती मोहीम राबविली, पोलीस ठाणे परिसर स्वच्छता यासह अन्य कामांची माहिती घेत शहरातील पाचही पोलीस ठाण्यांतील निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांसह कर्मचाऱ्यांची झाडाझडती अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी शनिवारी घेतली.
अप्पर पोलीस अधीक्षक काकडे यांनी शनिवारी शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा, शहर वाहतूक शाखा, आदी पोलीस ठाण्यांना भेटी देऊन पाहणी केली. वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला. वाहतूक समस्या, दाखल गुन्हे, निर्गत गुन्हे, प्रलंबित गुन्हे, सामाजिक उपक्रम यांसह रोजकीर्द नोंदवही, महत्त्वाची कागदपत्रे, बँक पासबुके, बँक शिल्लक रकमेप्रमाणे रोजकिर्दीशी ताळमेळ, दरमहा शिल्लक रकमेचा आढावा घेतल्याच्या नोंदी, चलनाने जमा करण्यात आलेल्या महसुली जमेची पडताळणी, सर्व प्रकारची दंड वसुली, आदी प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. काही अधिकाऱ्यांची कामकाजामध्ये प्रगती दिसून येत नसल्याने त्यांची थेट कानउघाडणी केली. पोलीस ठाणे परिसर फिरुन स्वच्छतेची माहिती घेतली. अचानक भेटीने काहीजणांच्या चेहºयावर तणाव व भीती दिसत होती.