मैनुद्दीन पळून जाण्याची पोलिस वाट बघत होते का?

By admin | Published: June 3, 2016 01:15 AM2016-06-03T01:15:07+5:302016-06-03T01:36:05+5:30

तपासाबद्दल संशय : पैशाच्या आकड्यातही ‘गोलमाल’; ७० लाख आताच कुठून आले?

Police were waiting for Manidin to flee? | मैनुद्दीन पळून जाण्याची पोलिस वाट बघत होते का?

मैनुद्दीन पळून जाण्याची पोलिस वाट बघत होते का?

Next

कोल्हापूर : वारणानगरमधील चोरीच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मैनुद्दीन मुल्ला याला अटक करून त्याची चौकशी करूनही त्याच्याकडील ७० लाख रुपयांचा छडा पोलिसांना लावता आला नाही. तो पैसे घेऊन पसार झाल्यावर पोलिस जागे झाल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे या एकूणच प्रकरणाच्या तपासाबाबत संशयाचे दाट धुके निर्माण झाले आहे. या प्रकरणी मुल्लाचा मित्र व त्याच्या पत्नीस अटक केल्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी हे प्रकरण उजेडात आणले आहे.
मुल्ला याने चोरीतील तब्बल तीन कोटी सात लाख रुपये मिरजेतील बेथेलहेमनगरातील मेहुणीच्या घरात ठेवले होते. त्याचा सुगावा सांगली पोलिसांना लागल्यावर त्यांनी छापा टाकून ही रक्कम जप्त केली. पोलिस तपासात ही चोरी आपण वारणानगर शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतून केली असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याठिकाणी तपास केला असता तेथे झडतीत पुन्हा एक कोटी २९ लाख रुपये सापडले. ही रक्कम आपली असल्याचा दावा पोलिस दारात आल्यावर बांधकाम व्यावसायिक झुंझारराव सरनोबत यांनी केला. या पैशाचा ताबा आयकर विभागाने घेतला आहे. त्यानंतर मुल्ला याची दोन आठवड्यांपूर्वी जामिनावर सुटका झाली. त्याने कोडोली पोलिसांत दर शनिवारी हजेरी देणे बंधनकारक असताना तो तिकडे फिरकला नाही. तरीही पोलिसांना त्याच्याबद्दल काहीच संशय आला नाही. मिरजेत तीन कोटी सात लाख, वारणानगरला एक कोटी २९ लाख पकडले असून आता तो ७० लाख रुपये घेऊन पसार झाल्याचे पोलिसच सांगत आहेत. म्हणजे त्याने नक्की किती रकमेची चोरी केली, हेच अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही रक्कम कुणाची आहे, त्याने ती आतापर्यंत कुठे लपवून ठेवली होती, एवढी मोठी रोख रक्कम घरात आणून ठेवण्याचे कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु, त्याच्या उत्तरापर्यंत तीन महिन्यांत पोलिसांना जाता आलेले नाही. जप्त केलेली रक्कम दाखविलेल्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त आहे, अशी चर्चा घटना उघडकीस आली तेव्हापासून मिरज व वारणानगर परिसरातही सुरू आहे. त्याला मुल्ला पुन्हा पैसे घेऊन पळून गेल्याने पुष्टीच मिळाली आहे.


पोलिसांनी मुळापर्यंत जाण्याचे ‘कष्ट’ घेतले नाही
मुल्ला याचे साथीदार असलेले विनायक जाधव व मुल्ला याची पत्नी निलोफर यांना पोलिसांनी आता अटक केली आहे. मुल्ला याने अस्तित्वातच नसलेल्या रेहान अन्सारीचे नाव पोलिसांना सांगितले व त्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला. ती व्यक्ती आहे की नाही, याच्याही मुळापर्यंत जाण्याचे कष्ट पोलिसांनी घेतलेले नाही. आता त्याची पत्नी मुल्ला याने आणलेले पैसे मोजत होती, असे पोलिस सांगत आहेत; मग मोजलेले पैसे घेऊन तो पळून जाण्याची पोलिस वाट बघत होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुल्लाकडून बुलेट घेतल्याचे निष्पन्न झाल्याने मिरज पोलिसांतील दोन कॉन्स्टेबलना मंगळवारी (दि. ३१) निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: Police were waiting for Manidin to flee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.