नव्या वर्षात पोलिसांचे राहणार डिजिटल पेट्रोलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:29+5:302021-01-02T04:20:29+5:30
कोल्हापूर : नव्या वर्षात गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी शहर व परिसरात डिजिटल पेट्रोलिंग सुरू करण्यात येणार आहे. शहरातील चारही पोलीस ...
कोल्हापूर : नव्या वर्षात गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी शहर व परिसरात डिजिटल पेट्रोलिंग सुरू करण्यात येणार आहे. शहरातील चारही पोलीस ठाण्यांना प्रत्येकी एक मोबाईल व्हॅन व चार दुचाकी गस्त घालण्यासाठी देण्यात येणार आहेत. या यंत्रणेद्वारे २४ तास गस्त घालण्यात येऊन त्याचे नियंत्रण हे पोलीस मुख्यालयात कंट्रोल रूममध्ये असेल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गुरुवारी दिली.
नव्या वर्षात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा या उद्देशाने ज्येष्ठांची फसवणूक, तोतया पोलिसांकडून होणारी फसवणूक, चोऱ्या, चेन स्नॅचिंग अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणेद्वारे २४ तास गस्त ठेवण्याचा उपक्रम पोलीस दलातर्फे नव्याने सुरू करण्यात येत आहे. या विशेष गस्तीचे नियंत्रण हे नियंत्रण क़क्षात (नं. १००) कडे असेल. तीन सत्रांत होणारी ही गस्त विशेषत: गर्दीच्या ठिकाणांसह ठरावीक उपनगरांत निर्जन स्थळी घालण्यात येणार आहे.
गस्त वाहनांना असेल ‘क्यूआर कोड’
गस्तीच्या वाहनांना क्यूआर कंट्रोलिंग असल्याने संबंधित बीट मार्शलकडून कोणत्या भागात किती वेळ गस्त घातली, तारीख, वेळ व ठिकाणानुसार नोंदींची माहिती एकत्रित संकलित होणार आहे. शिवाय नियंत्रण कक्षात फोन नं. १००वर आलेल्या तक्रारींचे निरसन केले का? याच्यावरही वरिष्ठांकडून अंकुश राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
दोनशे पॉईंटवर विशेष नजर
शहरात गर्दीचे व संवेदनशील असे सुमारे २०० पॉईंट गस्तीसाठी निश्चित केले आहेत. शाळा, महाविद्यलयांचाही या पॉईंटमध्ये समावेश आहे. ठरवून दिलेल्या दिवशी व निश्चित वेळेत संबधित वाहनांद्वारे गस्त घातली जाईल.
२० पोलीस चौक्या कार्यरत
बंद असलेल्या जिल्ह्यातील २० पोलीस चौक्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून त्या कार्यरत होतील. शहराच्या प्रमुख चौकांत पोलीस बंदोबस्त कायम राहणार आहे.
कोट ...
गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी शहर परिसरात चार मोबाईल व्हॅनसह १६ दुचाकींवरून पोलीस २४ तास गस्त घालणार आहेत. गस्तीची सर्व वाहने नियंत्रण क़क्षाला जोडण्यात येणार आहेत.
- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा