पोलिसांना अवैध व्यावसायिकांशी मैत्री पडणार महागात-: पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 01:15 PM2019-04-11T13:15:06+5:302019-04-11T13:23:47+5:30
जनतेमध्ये विश्वास निर्माण केलेल्या पोलीस दलाची काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे नाचक्की होऊ लागली आहे. खात्यामध्ये छुप्या मार्गाने अवैध व्यावसायिकांशी सलगी वाढवून हप्ता वसुली करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची गय
कोल्हापूर : जनतेमध्ये विश्वास निर्माण केलेल्या पोलीस दलाची काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे नाचक्की होऊ लागली आहे. खात्यामध्ये छुप्या मार्गाने अवैध व्यावसायिकांशी सलगी वाढवून हप्ता वसुली करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची गय केली जाणार नाही. यापुढे जिल्ह्यामध्ये अवैध धंदे सुरू राहिल्यास संबंधित हद्दीच्या प्रभारी निरीक्षकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस दलात लाचखोरीच्या घटनांमुळे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला कलंक लागत आहे. पोलिसांच्या या वरकमाईमुळे परिक्षेत्रात मटका, जुगार, दारू, वेश्या, आदी अवैध व्यवसाय जोमाने सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांशी मैत्रीचे नाते न जोडता गुन्हेगारांशी पोलिसांची सलगी आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे पोलिसांवर हल्ला करण्याचे धाडस होत आहे, यापुढे जिल्ह्यात अवैध धंदे सुरू राहणार का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. देशमुख यांनी सांगितले, कॉन्स्टेबल ते निरीक्षक, पोलीस उपअधीक्षकांपर्यंत खात्यामध्ये अवैध व्यावसायिकांशी संबंध चालणार नाहीत. तसे आढळून आल्यास संबंधितांना जबाबदार धरून कठोर कारवाई केली जाईल. अवैध धंदे पूर्णत: मोडीत काढा, अशा सूचना निरीक्षकांना दिल्या आहेत.
बहुतांश पोलीस ठाण्यांच्या स्तरावर अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी जातीनिशी लक्ष देत नसल्याने अवैध धंदे वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. यापुढे एकाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे दिसून आल्यास त्यांच्यावर खात्याअंतर्गत कारवाई केलेली दिसून येईल, असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही अवैध व्यावसायिक किंवा गुन्हेगारांना मदत करणाऱ्या काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली आहे. शोकॉज नोटिसा पाठवून खुलासा देण्याच्या नोटिसा काढल्या आहेत. यापुढे मात्र कठोर कारवाई केली जाईल.
२२ क्लबचे परवाने रद्द होणार
जिल्ह्यात सांस्कृतिक क्लबच्या नावाखाली जुगार चालविणाºया २४ क्लबविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी २२ क्लबचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाºयांना प्रस्ताव सादर केला आहे. सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली बहुतांश क्लबमध्ये जुगारच चालतो, ही वस्तुस्थिती आहे. कर्नाटक सीमेवर हा प्रकार मोठा आहे. जिल्ह्यात मात्र यापुढे कठोर कारवाई झाल्याचे दिसून येईल, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.