पोलिसांची पालखी टेंबलाईवर
By admin | Published: August 5, 2015 12:03 AM2015-08-05T00:03:43+5:302015-08-05T00:03:43+5:30
त्र्यंबोली यात्रा : ‘पी ढबाक्’चा गजर; राजाराम महाराज यांच्या काळापासून प्रथा कायम
कोल्हापूर : आषाढातल्या तिसऱ्या मंगळवारी पोलीस मुख्यालयातील पालखी... ‘पी ढबाक्’चा गजर आणि काही मंडळांच्या डॉल्बीच्या दणदणाटात त्र्यंबोली यात्रा झाली. शहरातील पेठा-पेठांतून, तरुण मंडळांच्यावतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले.
आषाढातल्या तिसऱ्या मंगळवारी पोलीस मुख्यालयातील पालखी टेंबलाई टेकडीवर जाते. त्याशिवाय त्र्यंबोली यात्रेचा पुढचा सोहळा होत नाही अशी प्रथा आहे. राजाराम महाराजांच्या काळात टेंबलाई देवीचा मुखवटा मुख्यालयातील १ नंबर खोलीत नेला जायचा. यात्रेच्या आदल्या दिवशी टेकडीवरील गुरव मुख्यालयात येऊन भजनाचा कार्यक्रम करून पहाटे तो घेऊन जात, अशी राजाराम महाराजांच्या काळातील दस्तावेजांमध्ये नोंद आहे. आजदेखील ही परंपरा चालू आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील पालखी टेंबलाई मंदिराकडे नेण्यात आली. यावेळी भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
याशिवाय शहरातील विविध पेठांमधून, तालीम, मंडळे यांच्यावतीने ‘पी ढबाक्’च्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. त्यात कुमारिका व सुवासिनी महिला नदीचे नवीन पाणी भरलेली कळशी डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या होत्या. गेल्या काही वर्षांत त्र्यंबोली यात्रेला डॉल्बी लावण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे काही मंडळांनी ‘पी ढबाक् ’ या पारंपरिक वाद्यांऐवजी डॉल्बीच्या दणदणाटात त्र्यंबोली यात्रा काढल्याचे चित्र शहरात दिसत होते. त्यानंतर मंगळवार आणि शुक्रवार मिळून आणखी पाच वार त्र्यंबोली यात्रेसाठी मिळणार आहेत. त्यामुळे ज्या पेठांनी किंवा गल्ल्यांमधील मंडळांनी अद्याप यात्रा काढलेली नाही त्यांच्यावतीने वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)