नोटा गिळून पोलिसाने ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:54 AM2017-08-29T00:54:16+5:302017-08-29T00:55:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भवानी मंडप परिसरात तक्रारदाराकडून पंधराशे रुपयांची लाच घेतल्यानंतर ‘एसीबी’च्या ट्रॅपची चाहूल लागताच जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने पाचशे रुपयांच्या तीन नोटा गिळल्या. त्यानंतर तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून त्याला पकडले.
पोलीस नाईक पंडित रंगराव पोवार (वय ३५, रा. बालिंगा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. नोटा गिळल्याने त्याला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, तक्रारदार हे मेडिकल रिप्रेझेंटिव्ह म्हणून नोकरीस आहेत. त्यांना नोकरीच्या निमित्ताने संधी मिळाली तर परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असल्याने दि. २४ जून २०१७ला पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज केला होता. हा अर्ज चारित्र्य पडताळणीसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आला.
या विभागाकडे पासपोर्ट व्हेरिफिकेशनचे काम पंडित पोवार याच्याकडे आहे.त्याने पासपोर्टचे न होणारे काम आम्ही करून देत आहोत, असे सांगून त्यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्याकडे तक्रार केली. सरकारी पंचांसमक्ष तडजोडीअंती पंधराशे रुपयांची मागणी पोवार याने केल्याची खात्री होताच सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सापळा रचला.
तक्रारदाराने पोवारला फोन करताच त्याने पोलीस ठाण्याच्या समोरच्या चहाच्या टपरीजवळ येण्यास सांगितले. काही वेळाने तो याठिकाणी आला. तक्रारदाराने पाचशे रुपयेच्या तीन नोटा दिल्या. आजूबाजूला सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाला पाहताच नोटा गिळून धूम ठोकली. भवानी मंडप मुख्य कमानीच्या दिशेने तो पळत सुटला. यावेळी थरारक पाठलाग करून त्याला पकडले. तेथून त्याला थेट सीपीआर रुग्णालयात आणले. त्याच्या हाताच्या तळव्याला, पँटला व तोंडाला अँथ्रासिन पावडर लागली होती. हे पाहून त्याची बोलतीच बंद झाली. रात्री उशिरापर्यंत त्याच्या पोटातील नोटा बाहेर काढण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरा त्याच्या घराची झडती घेतली.
आठ दिवसांत दोन ट्रॅप
मित्राच्या भावाच्या प्रेमप्रकरणात मध्यस्थी केल्याचा तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना राजारामपुरी पोलीस ठाण्यातील हवालदार किरण दत्तात्रय गवळी (वय ४३, रा. फुलेवाडी) याला अटक केली होती. त्यानंतर पंडित पोवारला लाच घेताना कारवाई करण्यात आली. आठ दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुसरी कारवाई केल्याने पोलीस खात्याची नाचक्की झाली आहे.