शहांसमोर पोलिसांची नरमाई
By admin | Published: April 12, 2016 12:56 AM2016-04-12T00:56:14+5:302016-04-12T00:58:09+5:30
थेट घरी जबाब : आजारी व वृद्ध असल्याचे पोलिसांपुढे कारण
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या नूतन उपसभापती सुरेखा शहा यांना दोनवेळा समन्स पाठवूनही त्या चौकशीसाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर राहिल्या नाहीत. अखेर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत त्यांच्या घरी जाऊन जबाब घेतला. शहा या उपसभापती झाल्यापासून महापालिकेत रोज येतात. त्यावेळी त्यांचा आजार व वृद्धपणा कोठे जातो. त्या गुंड तहसीलदारच्या नातेवाईक असतानाही त्यांच्या घरी जाऊन जबाब घेणे व त्यांचाच चहा पिऊन माघारी परतणाऱ्या शाहूपुरी पोलिसांनी खाकी वर्दीची अब्रू वेशीला टांगली आहे.
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या उपसभापती सुरेखा प्रेमचंद शहा यांच्या फ्लॅटमध्ये सराईत गुंड स्वप्निल तहसीलदार, जवाहर चंदवानी, गोपी आहुजा, कन्हैया कटियार हे दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका या क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असताना मिळून आले होते. फ्लॅटमध्ये बेटिंग घेण्यास संमती दिल्याप्रकरणी सुरेखा शहा यांना दोनवेळा समन्स बजावूनही त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना बेटिंग प्रकरणात आरोपी केले. त्या तपास अधिकारी विद्या जाधव यांचा फोनही उचलत नव्हत्या. जबाबासाठी पोलिस ठाण्याकडे त्या फिरकत नसल्याचे पाहून अखेर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत त्यांची थेट घरी भेट घेतली. यावेळी शहा यांनी, आपण वृद्ध आहे, आजारी असल्यामुळे पोलिस ठाण्यात येऊ शकलो नाही, असे सांगितले.
बेटिंगप्रकरणी उपसभापती सुरेखा शहा यांना आरोपी केले आहे. त्या जबाब देण्यासाठी पोलिस ठाण्यात हजर होत नव्हत्या. तपास अधिकारी विद्या जाधव यांनी त्यांना समन्स पाठविली होती. त्यांनी त्यांचा जबाब घरी जाऊन घेतला आहे, हे खरे आहे. शहा यांच्या विरोधात लवकरच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करू. - अरविंद चौधरी, पोलिस निरीक्षक