‘डॉल्बी’ विघ्नावर पोलिसांचा उतारा--लोकमतचा प्रभाव
By admin | Published: July 24, 2014 12:16 AM2014-07-24T00:16:57+5:302014-07-24T00:19:03+5:30
मनोजकुमार शर्मा : मंडळांच्या बैठका घेण्याचे आदेश
कोल्हापूर : गतवर्षी सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची परंपरा यंदाही सुरू ठेवण्याचा निर्धार जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतला आहे. ‘गणेशोत्सवात यंदा ‘डॉल्बी’चे विघ्न’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. यंदाचाही गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना तत्काळ कामाला लागण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आज, बुधवारी दिल्या.
गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे. गेली दोन वर्षे डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या पोलीस प्रशासनाला मात्र अद्याप जाग आलेली नाही. पोलीस अधीक्षकांपासून ते पोलीस निरीक्षकांपर्यंतचे सर्व अधिकारी नव्याने कोल्हापुरात रुजू झाल्याने त्यांना गणेशोत्सवाचे गांभीर्य कदाचित लक्षात आले नाही. यापूर्वी सहा महिने अगोदरच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांकडून प्रबोधन, मंडळांच्या बैठका घेतल्या जात होत्या. यावर्षी एकही बैठक घेण्यात आली नाही. ‘लोकमत’च्या वृत्ताने झोपलेले पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.
डॉ. शर्मा यांनी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांना यंदाही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करा, अशा लेखी सूचना दिल्या. त्यानुसार येत्या काही दिवसांत मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रबोधन करण्यासाठी ज्या-त्या पोलीस ठाण्यांचे कर्मचारी बाहेर पडताना दिसणार आहेत. दोन वर्षांत जिल्ह्यातील गणेश मंडळे, तालीम संस्था, राजकीय पक्ष यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने डॉल्बीविरहित गणेशोत्सव साजरा झाला. डॉल्बी न वापरल्याने मंडळांना शिल्लक राहिलेल्या कोट्यवधी रकमेचा अन्य समाजोपयोगी कामांकरिता वापर करता आला. (प्रतिनिधी)
लोकांना त्रासदायक वाटणाऱ्या डॉल्बीचा विचार मनात कधीच आणणार नाही. अद्यापही वेळ गेलेली नाही, पोलीस अधीक्षक
डॉ. शर्मा यांनी तालीम-मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची लवकरात लवकर बैठक घ्यावी, डॉल्बीचे पुन्हा प्रबोधन करावे, याला सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
- गजानन यादव,
अध्यक्ष, लेटेस्ट तरुण मंडळ
डॉल्बी बंद झाल्याने वाजंत्र्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे तरुणांकडून डॉल्बीसाठी आग्रह धरला जात आहे. परंतु आम्ही परंपरेला गालबोट न लागता तरुणांचे प्रबोधन करून यंदाचाही गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्याचा निर्धार करणार आहोत.
- वसंत कोगेकर
अध्यक्ष, शाहूनगर मित्रमंडळ