पोलिसावर खुनी हल्ला; तिघांना अटक
By Admin | Published: September 26, 2016 12:58 AM2016-09-26T00:58:59+5:302016-09-26T00:58:59+5:30
सीबीएसवर किरकोळ वादातून घडला प्रकार
कोल्हापूर : ठाणे शहर पोलिस दलातील पोलिस समीर सदाशिव बेलेकर (वय २५, रा. सडोली खालसा, ता. करवीर) यांच्यावर शनिवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघा तरुणांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी प्रज्वल दिनेश देवरीकर (वय १९), निरंजन सतीश घाडगे (२६), विशाल प्रकाश वडर (१९, सर्व रा. राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत.
समीर बेलेकर हे ठाणे शहर येथे पोलिस दलात कॉन्स्टेबल आहेत. अर्जित रजा घेऊन ते ठाण्याहून गावी जाण्यासाठी बसने शनिवारी रात्री साडेअकराच्यासुमारास मध्यवर्ती बसस्थानक येथे आले. या ठिकाणी गावी जाणाऱ्या बसची चौकशी केली असता त्यांना बस नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी गावाकडील मित्राला फोन करून येथे येण्यास सांगितले. तोपर्यंत नाष्टा करून दाभोळकर कॉर्नरकडे जात असताना सह्णाद्री हॉटेलजवळ मोटारसायकलवरूनआलेल्या तिघा तरुणांनी मोटारसायकल त्यांना घासून नेली.
त्यांना ते ‘गाडी सरळ चालवा’ असे म्हणाले. यावेळी ‘बघतोस काय?’ म्हणून त्यांनी त्यांच्याशी वादावादी केली व त्यांच्यावर चाकूने वार करून ते पळून गेले. जखमी बेलेकर यांना नागरिकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. शाहूपुरी पोलिसांना स्टेशन रोडवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघा तरुणांचे फुटेज मिळून आले. मोटारसायकलचा क्रमांक व फुटेजवरून काही तासांतच त्यांना अटक केली.
त्यांच्याकडे चौकशी केली असता प्रज्वल देवरीकर याने चाकूने वार केल्याची कबुली दिली. हे तिघे नेहमी स्टेशन रोड परिसरात फिरत असतात. त्यांनी यापूर्वी येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही दादागिरी करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी यापूर्वी कधी प्रवाशांना धाक दाखवून लूटमार केली आहे का, याची चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)