पोलिसांचे ‘आॅपरेशन मुस्कान’ अर्ध्या वाटेवर
By Admin | Published: January 22, 2016 01:20 AM2016-01-22T01:20:37+5:302016-01-22T01:20:53+5:30
शोधकार्य थांबले : वर्षभरापासून दोन चिमुकल्या बहिणी आईच्या प्रतीक्षेत
सचिन लाड -- सांगली -वाट चुकलेल्या, भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या मुलांना जगण्याचा नवा मार्ग दाखवून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य फुलविण्यासाठी सुरू झालेली पोलिसांची ‘मुस्कान’ मोहीम अर्ध्या रस्त्यावरच थांबली. शोधकार्यातील हलगर्जीपणामुळे मिरजेत भीक मागताना सापडलेल्या दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य अद्याप फुललेच नाही. खऱ्या पालकांचा शोध घेऊन खरे हास्य फुलविण्याचे काम अजूनही बाकी आहे. गतवर्षी मिरजेत दोन मुली भीक मागताना सापडल्या. या दोघीही सख्ख्या बहिणी होत्या. त्यांच्यासोबत आईही होती. पण पोलिसांनी पकडल्यानंतर ती गायब आली. आज-ना-उद्या येऊन ती मुलींचा ताबा घेईल, अशी अपेक्षा होती. पण तेव्हापासून ती फिरकलीच नाही. त्यामुळे या मुली वारस असूनही बेवारस झाल्या आहेत. आईचा पत्ता असूनही पोलिसांनी शोध घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न सुरु ठेवले नाहीत. ती आई नसेल तर मग खऱ्या पालकांपर्यंत या मुलींना पोहचविण्याचा प्रयत्न तरी व्हायला हवा होता. बेवारस, वाट चुकलेले व बालकामगार अशा मुलांचा शोध घेण्यासाठी केंद्र शासनाने गतवर्षीपासून विशेष मोहीम उघडली आहे. गेली महिनाभर ही मोहीम राबविली जाते. सांगली पोलिसांनी गतवर्षी या मोहिमेस ‘आॅपरेशन मुस्कान’ असे नाव दिले आहे. यंदाही ती राबविली जात असून, त्यास ‘आॅपरेशन स्माईल’ असे नाव दिले आहे. गतवर्षी मिरजेत रेल्वे स्टेशन परिसरात मिरज शहर पोलीस व अहमद चॅरिटेबल ट्रस्ट यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबविली होती. त्यावेळी पूजा (वय ३ वर्षे) ही चिमुरडी भीक मागताना सापडली होती. तिच्या काखेत आरती ही आठ महिन्याची मुलगी होती. त्यांच्यामागे शोभा सुरेश माले ऊर्फ शोभा दादा गोसावी ही महिला होती. तिच्याही काखेत एक लहान मूल होते. हे सर्वजण हातात डबा घेऊन भीक मागताना आढळून आले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, शोभाने पूजा व आरती या दोन्ही मुली माझ्या असल्याचे सांगितले. पोलिसांनी रितसर त्यांचा ताबा घेऊन, पूजा आणि आरतीची बालसुधारगृहात रवानगी केली होती. शोभा माले ही मुलांसोबत मिरजेतील मार्केटमध्ये राहत होती. तिचे ग्यानवाडी (जि. बेळगाव) हे मूळ गाव आहे. बाल न्यायाधीकरण समितीच्या अध्यक्षाच्या आदेशाने दोघींना माधवनगर रस्त्यावरील घन:श्यामनगर येथील भारतीय समाज सेवा केंद्रात दाखल केले होते. एक वर्ष उलटला तरीही त्यांची आई मुलींना नेण्यासाठी आली नाही.
प्रतीक्षा आईची!
पोलिसांनी सुरू केलेली मोहीम कौतुकास्पदच आहे. पण याच मोहिमेत सापडलेल्या पूजा आणि आरती या बहिणींना अद्याप त्यांची आई मिळालेली नाही. औपचारिकता म्हणून मुलांना पकडण्याची मोहीम फत्ते केली. या मुलींना बालसुधारगृहात पाठवून पोलीस निवांत झाले. कदाचित पोलीस कारवाई करतील, या भीतीने शोभा माले आली नसेल किंवा त्या दोघींचे अन्य पालक असतील, त्याचा तपास अपूर्ण आहे.
शोभा माले हिने तिच्या दोन मुलींना येत्या तीस दिवसांत ओळख पटवून घेऊन जावे. अन्यथा बालकल्याण समिती अध्यक्षांच्या आदेशाने या दोन्ही मुलींच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केली जाईल.
- प्रभाकर माने, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, सांगली