संच मान्यतेचा सुधारित प्रस्तावातून शाळा बंद करण्याचे धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:52 PM2020-09-07T17:52:17+5:302020-09-07T17:56:20+5:30
संच मान्यतेचा हा सुधारीत प्रस्ताव म्हणजे ग्रामीण भागातील शाळा पूर्णपणे बंद करण्याचे धोरण आहे. त्यामुळे या प्रस्तावास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने तीव्र विरोध केला आहे. या प्रस्तावाविरोधात शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी दिली.
कोल्हापूर : संच मान्यतेचा हा सुधारीत प्रस्ताव म्हणजे ग्रामीण भागातील शाळा पूर्णपणे बंद करण्याचे धोरण आहे. त्यामुळे या प्रस्तावास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने तीव्र विरोध केला आहे. या प्रस्तावाविरोधात शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी दिली.
शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघासह शिक्षण संस्था चालक संघ शिक्षक व सेवक यांच्या संघटनांची संयुक्त बैठक मुख्याध्यापक संघामध्ये संच मान्यता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भात चर्चा करण्यात आली. शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी दि. १३ जुलै २०२० रोजी सुधारीत संच मान्यता धोरण शासनाकडे प्रस्तावीत केले आहे. हे धोरण अतिशय चुकीचे असून शाळांच्यावर अन्याय करणारे आहे.
संच मान्यते संदर्भात शालेय शिक्षण विभागाचा दि.२८ ऑगस्ट २०१५चा निर्णय चुकीचा होता. त्या विरोधात महाराष्ट्रातून आंदोलने झाली. तरीही ते धोरण २०१५-१६ पासून राबविले गेले. संच मान्यतेचा सुधारित प्रस्तावामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याचा धोका असल्याने त्याविरोधात आंदोलन केले जाणार असल्याचे लाड यांनी सांगितले. या बैठकीत नवे शैक्षणिक धोरणाविरोधी ठराव मंजूर करण्यात आला.
कायम विनाअनुदानित शाळांच्या आंदोलनास पाठींबा देण्यात आला. सचिव दत्ता पाटील यांनी विविध ठराव मांडले. यावेळी संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, शिक्षण संस्थाचालक संघ अध्यक्ष वसंतराव देशमुख, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, संतोष आयरे , पी. एन. पाटील, गजानन काटकर, राजाराम बरगे ,अशोक पाटील, मिलींद पांगिरेकर, जी ए पाटील, अशोक हुबळे ,एम .आर. पाटील, अजित रणदिवे, एस. के .पाटील, राजेश वरक, सुधाकर सावंत उपस्थित होते.