शिरोळला राजकीय गणिते बदलणार

By admin | Published: April 30, 2015 09:16 PM2015-04-30T21:16:46+5:302015-05-01T00:20:20+5:30

ग्रामपंचायत निवडणुका : गोकुळ, जिल्हा बँक निवडणुकीचे पडसाद उमटणार

Political calculations will change in Shirol | शिरोळला राजकीय गणिते बदलणार

शिरोळला राजकीय गणिते बदलणार

Next

संदीप बावचे - शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे गेल्या असल्या, तरी सत्ताधारी व विरोधी गटाकडून राजकारणाची फेर जुळणी सुरू झाली आहे. अंतिम टप्प्यातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. आगामी होणाऱ्या व मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
३३ ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत गोकुळ व जिल्हा मध्यवर्ती बॅँक निवडणूकीतील पडसाद तालुक्यात उमटणार आहेत. यामुळे तालुक्यातील गटातटालाही राजकीय रंग येणार आहे.
शिरोळ तालुक्यातील
३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण निश्चित झाल्यानंतर गावागावांतील राजकीय वातावरण तापू लागले होते. मात्र, निवडणुका जुलै की आॅगस्टमध्ये होणार याबाबत संभ्रमावस्था होती. विविध राजकीय गट नेत्यांनी गावातील आपले राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी आरक्षणानुसार सक्षम उमेदवारांचा शोध घेतला होता.
दरम्यान, अचानक ग्रामपंचायत निवडणुकींंचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली, शिवाय सत्ताधारी व विरोधी गटाला गटातटाच्या बांधणीसाठी फारसा वेळ नसल्यामुळे काही गावांत कॉँग्रेस-स्वाभिमानी, तर राष्ट्रवादी-स्वाभिमानी, कॉँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षातील कार्यकर्ते एकत्र येऊन आघाड्यांसाठी प्रयत्नशील झाले होते. मात्र, निवडणुका पुढे गेल्याने राजकारण बदलले जात आहे. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये निवडणुका ग्रहित धरून पुनर्बांधणी सुरू झाली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात या आघाडी बांधण्यासाठी एकत्र आलेले कार्यकर्ते इकडून-तिकडे अशी परिस्थिती सध्या बनली आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकाला रोखण्यासाठी डावपेच आखत आहेत. प्रबळ गटाला रोखण्यासाठी व्यूव्हरचना आखली जात आहे. काही ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच बदलही घडले आहेत.
अंतिम टप्प्यात आलेल्या नळ पाणी योजना लवकर पूर्ण कशा होतील, यासाठी धावाधाव सुरू आहे. प्रभागातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, आदी सोयी पुरविण्याकडे सध्या सत्ताधारी गटाने लक्ष केंद्रित केले आहे. प्रभाग आरक्षण निश्चित असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. इच्छुकांकडून आतापासूनच प्रचार मोहीम राबविली जात आहे. विधानसभेनंतर तालुक्यातील राजकीय गणिते बदलत चालली आहेत. गावागावांतील सहकारी सेवा संस्थांच्याही निवडणुकीत बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. गोकुळ व केडीसीसी बॅँक निवडणुकीतील पडसादही येणाऱ्या
३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत निश्चितच जाणवणार आहेत.
तालुक्यातील कोथळी, जैनापूर, दानोळी, उदगांव, कोंडिग्रे, चिपरी, तमदलगे, जांभळी, धरणगुत्ती, नांदणी, निमशिरगांव, अर्जुनवाड, कुटवाड, घालवाड, शिरटी, हसूर, कवठेगुलंद, गौरवाड, आलास, शेडशाळ, नृसिंहवाडी, गणेशवाडी, बुबनाळ, घोसरवाड, जुने दानवाड, टाकळीवाडी, दत्तवाड, तेरवाड, बस्तवाड, मजरेवाडी, यड्राव, शिरदवाड, शिरढोण या गावांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची तारीख व सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले आहे.


गटा-तटाचे डावपेच सुरू
जातीय समीकरणावर विधानसभा निवडणूक रंगल्यानंतर शिरोळ तालुक्यात राजकारणाला वेगळाच रंग चढला आहे. खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, ‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, ‘कॉँग्रेस’चे तालुकाध्यक्ष अनिल यादव, आदींची भूमिका व राजकीय डावपेच कशा पद्धतीने आखले जातात यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

Web Title: Political calculations will change in Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.