बंद देऊळ उघडण्यावर राजकीय धुरळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:52 AM2021-09-02T04:52:36+5:302021-09-02T04:52:36+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे गेली दीड वर्षे बंद असलेली मंदिरे आणखी काही दिवस उघडू नयेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विरोधी पक्षांनीही लसीकरणासाठी ...
कोल्हापूर : कोरोनामुळे गेली दीड वर्षे बंद असलेली मंदिरे आणखी काही दिवस उघडू नयेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विरोधी पक्षांनीही लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, एकदा लसीकरण पूर्ण झाले की निर्बंध घालून मंदिरे उघडावीत, असे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे मत आहे. दुसरीकडे बार, रेस्टॉरंट, बाजारपेठा सगळे व्यवहार सुरू असताना केवळ मंदिरांमध्येच कोरोना होतो का, असा भाजपने सवाल केला आहे. या विषयावर आता राजकीय धुरळा उडाला आहे.
काेरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे दिवाळीनंतरची दोन- तीन महिने वगळता बंद आहेत. मंदिरांवर फुलवाले, हारवाले, पूजेच्या साहित्यांचे विक्रेते, किरकोळ विक्रेते यांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या बाजारपेठा, हाॅटेल, बार रेस्टॉरंट सुरू झाले आहेत, मग फक्त मंदिरांमध्येच कोरोना होतो का, असा प्रश्न विचारत भाजपने आता मंदिरे खुली करावीत अशी मागणी केली आहे.
सध्या राज्यात संसर्ग कमी असला ती काही दिवसांपूर्वी केरळमध्ये झालेल्या मोठ्या उत्सवानंतर अचानक रुग्णांच्या संख्ये पुन्हा वाढ सुरू झाली आहे. केंद्रातील आरोग्य विभागाने सप्टेंबरअखेर तिसरी लाट सुरू होण्याची शक्यता वर्तविली आहे. शिवाय आता काही दिवसांतच गणेशोत्सव सुरू होत आहे, पुढील काळात एकामागोमाग सण येत आहेत. या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेत राज्य शासनाने मंदिरे उघडण्याची घाई केलेली नाही.
----
आणखी थोडे दिवस संयम हवा
मंदिराशी लोकभावना जोडल्या असल्या तरी सध्या नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. केरळमधील उत्सवानंतर रुग्ण वाढल्याने महाराष्ट्रात काय परिणाम होऊ शकेल याची माहिती घेतली जात आहे. धोका नसेल तर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. पुढील काळ सणांचा असल्याने मंदिरात गर्दी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आणखी काही दिवस याबाबत संयम राखला पाहिजे.
ए. वाय. पाटील (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
---
ही योग्य वेळ नव्हे
शिवसेनेने कायम हिंदुत्व जपले आहे, पण मंदिरे उघडण्याची ही योग्य वेळ नाही. आपला लढा कोरोनाविरोधात आहे. सप्टेंबरअखेर तिसऱ्या लाटेचा अंदाज असताना मंदिरे उघडण्याचा हट्ट म्हणजे निव्वळ राजकारण आहे. सध्या जीव महत्त्वाचा आहे. मतदारांना खूष करण्यासाठी त्यांच्या जिवाचा धोका पत्करणे योग्य नाही. त्यामुळे आणखी काही दिवस मंदिरे उघडू नयेत.
संजय पवार (जिल्हाध्यक्ष शिवसेना)
--
लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा मंदिरे उघडण्यााची मागणी करताना भारतीय जनता पक्षाने लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. सर्वांच्या सहभागातून लसीकरण पूर्ण झाली की, मंदिरे उघडायला काहीच हरकत नाही. तसे होत नसताना मंदिरात आलेले एखादा भक्त जरी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यामुळे अन्य व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका आहे. ते होऊ नये यासाठी लसीकरण, निर्बंध, नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
सचिन चव्हाण (शहर काँग्रेस समन्वयक)
---