VidhanSabha Election 2024: बिगुल वाजले..कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय हवा तापणार; संभाव्य लढती, सध्याचे बलाबल.. वाचा सविस्तर

By विश्वास पाटील | Published: October 16, 2024 02:23 PM2024-10-16T14:23:30+5:302024-10-16T14:24:37+5:30

जनता कुणाला गुलाल लावणार याचीच उत्सुकता

Political events in Kolhapur district will accelerate due to assembly elections | VidhanSabha Election 2024: बिगुल वाजले..कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय हवा तापणार; संभाव्य लढती, सध्याचे बलाबल.. वाचा सविस्तर

VidhanSabha Election 2024: बिगुल वाजले..कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय हवा तापणार; संभाव्य लढती, सध्याचे बलाबल.. वाचा सविस्तर

विश्वास पाटील

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता अधिकच तापणार आहे. लोकसभेला महायुतीला महाराष्ट्राने रोखले. जिल्ह्यात युती व महाविकास आघाडीला फिफ्टी-फिप्टी यश मिळाले. आता विधानसभेला कोल्हापूरची राजकीयदृष्ट्या जागरूक असलेली जनता कुणाला गुलाल लावणार याचीच उत्सुकता शिल्लक राहिली आहे.

लोकसभा आणि विधानसभेचे राजकीय गणित वेगवेगळे असते. लोकसभेला लोक मुख्यत: स्थानिक प्रश्नांवर फार भर देत नाहीत. परंतु विधानसभेला मात्र अनेक पदर असतात. महायुती सरकारने लोकसभेत अपयश आल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. लाडकी बहीण, कृषी पंपाची वीज बिले माफ, तीन गॅस सिलिंडर मोफत, मुलींचे शिक्षण मोफत अशा थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना सुरू करून त्याचा लाभही सुरू केला आहे.

त्याशिवाय सरकारकडे कोण काय मागायला गेलेय आणि सरकारने त्यांना नकार दिला आहे, असा मागच्या काही महिन्यातील अनुभव नाही. विविध जाती समूहांना खुश करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळेही खिरापतीसारखी वाटली आहेत. हे प्रत्यक्ष लाभ दिले परंतु लोकसभेला पडद्यामागून दिलेल्या लाभाने मतदारांचे डोळे पांढरे पडले होते. आता त्याचीही खैरात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाची विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत.

काँग्रेस-भाजप रस्सीखेच..

जिल्ह्यात सर्वाधिक ४ आमदार, दोन विधानपरिषदेचे आमदार आणि एक खासदार असे राजकीय बळ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे त्यांना ही जनमाणसावरील मांड कायम ठेवायची आहे. भाजपकडे लोकनियुक्त एकही पद नाही. त्यामुळे त्यांना शून्याची संगत साेडायची आहे.

यांची प्रतिष्ठा पणाला..

आमदार सतेज पाटील : महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर आणि नागपूर जिल्ह्यातच काँग्रेसचे गेल्या निवडणुकीत ४ आमदार निवडून आले आहेत. हे संख्याबळ टिकवून त्यात भर घालून महाराष्ट्राच्या राजकारणात वजन वाढवण्याची संधी आमदार सतेज पाटील यांना आहे. त्यादृष्टीनेही त्यांची कसोटी लागणार आहे.
आमदार हसन मुश्रीफ : पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ हे सलग पाचवेळा आमदार झाले आहेत. सहावेळा आमदार होण्याची संधी जिल्ह्यात आतापर्यंत कुणालाच मिळालेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत विजयाची परंपरा कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्याशिवाय आहे ते दोन संख्याबळ कायम ठेवण्याची कसरत आहे.
खासदार धनंजय महाडिक : भाजपमध्ये उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यानंतर कोल्हापूरची जबाबदारी खासदार म्हणून धनंजय महाडिक यांच्यावर आहे. मावळत्या सभागृहात भाजप शून्यावर आहे. राज्यात सर्वाधिक आमदार असलेल्या या पक्षाचा हा अपयशाचा डाग पुसून काढण्याची जबाबदारी महाडिक यांच्यावर असेल.
राजेश क्षीरसागर : एकेकाळी सहा आमदार असलेल्या शिवसेनेची स्थिती पक्ष दुभंगल्यानंतर सध्या एकच आमदार अशी झाली आहे. लोकसभेला मुख्यमंत्र्यांनी सर्व पातळीवर ताकद लावून गेलेली हातकणंगलेची जागा जिंकली. आता विधानसभेला स्वत: विजयी होण्यासह पक्षाचे संख्याबळ वाढवण्यासाठी क्षीरसागर यांना प्रयत्न करावे लागतील.
व्ही. बी. पाटील : हसन मुश्रीफ यांच्या तावडीतून पक्ष सुटल्यानंतर आता व्ही. बी. पाटील यांच्यावर जबाबदारी आहे की पक्षाला विधानसभेत प्रतिनिधित्व मिळवून देणे. त्यात त्यांनी किती यश मिळते याचा फैसला या निवडणुकीत होईल.
संजय पवार : उद्धवसेनेकडे आजच्या घडीला कोणतेच सत्तेचे पद नाही. पक्ष दुभंगल्यानंतर संजय पवार यांनी कार्यकर्त्यांची बांधणी करून संघटना जिवंत ठेवली परंतु आता लोकदरबारात जाऊन पक्षाला अधिमान्यता मिळवण्यासाठी त्यांना ताकद लावावी लागेल.

संभाव्य लढती

  • कोल्हापूर उत्तर : काँग्रेस विरुद्ध राजेश क्षीरसागर (शिंदेसेना)
  • कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील (काँग्रेस) विरुद्ध शौमिका महाडिक (भाजप)
  • करवीर : राहुल पाटील (काँग्रेस) विरुद्ध चंद्रदीप नरके (शिंदेसेना)
  • राधानगरी : प्रकाश आबिटकर (शिंदेसेना) विरुद्ध के. पी. पाटील (उबाठा किंवा काँग्रेस)
  • कागल : हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) विरुद्ध समरजित घाटगे (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष)
  • चंदगड : राजेश पाटील (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) विरुद्ध नंदाताई बाभूळकर (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष)
  • शाहूवाडी : विनय कोरे (जनसुराज्य शक्ती) विरुद्ध सत्यजित पाटील (उबाठा)
  • हातकणंगले : राजूबाबा आवळे (काँग्रेस) विरुद्ध अशोकराव माने (जनसुराज्य किंवा भाजप)
  • इचलकरंजी : राहुल आवाडे (भाजप) विरुद्ध मदन कारंडे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
  • शिरोळ : राजेंद्र यड्रावकर (अपक्ष) विरुद्ध उल्हास पाटील (उबाठा)


सध्याचे बलाबल

  • काँग्रेस : ०४
  • राष्ट्रवादी : ०२
  • अपक्ष : ०२
  • शिंदेसेना : ०१
  • जनसुराज्य : ०१


हे संभाव्य नवीन चेहरे असतील रिंगणात..

राहुल पाटील, राहुल आवाडे, मदन कारंडे, नंदिनी बाभूळकर, शौमिका महाडिक, कोल्हापूरचा काँग्रेसचा उमेदवार

तीन आमदार रिंगणातून आधीच बाहेर..

मावळत्या सभागृहातील आमदार प्रकाश आवाडे यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून राहुल याची उमेदवारी जाहीर केल्याने ते आता रिंगणात राहणार नाहीत. करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन झाल्याने त्यांचा मुलगा राहुल हा उमेदवार आहे. जयश्री जाधव यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम असल्याने त्या देखील या वेळेला रिंगणात असण्याची शक्यता कमी आहे.

कुणाचा किती विजयाचा रेट..

नेते :  लढले :  जिंकले

  • हसन मुश्रीफ ०६ - ०६
  • विनय कोरे ०५ - ०४
  • सत्यजित पाटील ०४ - ०२
  • प्रकाश आबिटकर ०३ - ०२
  • चंद्रदीप नरके ०३ - ०२
  • राजेश क्षीरसागर : ०३ - ०२
  • राजेंद्र पाटील-यड्रावकर : ०३ - ०१


लोकसभा निवडणुकीत कुणाला कोणत्या मतदार संघात मिळाले मताधिक्क्य

कोल्हापूर मतदार संघ
करवीर : शाहू छत्रपती (विजयी. महाविकास आघाडी) -७१८०३
राधानगरी : शाहू छत्रपती -६५५२२
कोल्हापूर उत्तर : शाहू छत्रपती-१३८०८
चंदगड : शाहू छत्रपती - ८९३८
कोल्हापूर दक्षिण : शाहू छत्रपती- ६७०२
कागल : संजय मंडलिक (महायुती) -१४४२६

हातकणंगले लोकसभा मतदार संघ
हातकणंगले : धैर्यशील माने (विजयी, महायुती )-१७४९३
इचलकरंजी : धैर्यशील माने-३९१७२
शिरोळ : धैर्यशील माने-३२४७
शाहूवाडी: सत्यजित पाटील (महाविकास आघाडी) - १८९९७
इस्लामपूर : सत्यजित पाटील - १७४८१
शिराळा : सत्यजित पाटील - ९२८१

राजकारणाची फेरमांडणी..

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापाठोपाठ गोकूळ व जिल्हा बँकेचीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे विधानसभेला ताकद वाढवून या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी सुरू आहे. आता तालुका पातळीवरील स्थानिक गट पाठिंबा देतानाही हाच विचार प्राधान्याने केला जात आहे. विधानसभेत कुणाचा झेंडा लागतो त्यावर जिल्ह्याच्या राजकारणाची फेरमांडणी होणार आहे.

सप्टेंबर २०२४ अखेरची मतदारसंघ निहाय मतदार संख्या

मतदार संघ : पुरुष : स्त्रिया : एकूण

  • चंदगड : १ लाख ६१ हजार ९३६ : १ लाख ६२ हजार १९१  ३ लाख २४ हजार १३६
  • राधानगरी : १ लाख ७५ हजार ६९६ : १ लाख ६४ हजार ९५७ : ३ लाख ४० हजार ६६५
  • कागल : १ लाख ६९ हजार २८३ : १ लाख ६९ हजार ४९४ : ३ लाख ३८ हजार ७८२
  • कोल्हापूर दक्षिण : १ लाख ८५ हजार २४५ : १ लाख ८२ हजार ५२० : ३ लाख ६७ हजार ८१६
  • करवीर : १ लाख ६६ हजार २६२ : १ लाख ५४ हजार ५५८ : ३ लाख २० हजार ८१९
  • कोल्हापूर उत्तर : १ लाख ४७ हजार ८६५ : १ लाख ५१ हजार ७१८ : २ लाख ९९ हजार ६००
  • शाहूवाडी : १ लाख ५५ हजार ७९५ : १ लाख ४६ हजार ९७८ : ३ लाख २ हजार ७८०
  • हातकणंगले (राखीव) : १ लाख ७२ हजार १३९ : १ लाख ६६ हजार ४७५ : ३ लाख ३८ हजार ६३३
  • इचलकरंजी : १ लाख ५७ हजार ९५ : १ लाख ५१ हजार ७४४ : ३ लाख ८ हजार ८९९
  • शिरोळ : १ लाख ६१ हजार ८६९ : १ लाख ६४ हजार ११३ : ३ लाख २५ हजार ९८४.

Web Title: Political events in Kolhapur district will accelerate due to assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.