मध्यमवर्गाच्या संख्येमुळे राजकीय प्रारूप बदलले : अशोक चौसाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:30 AM2019-06-03T00:30:39+5:302019-06-03T00:30:43+5:30
इचलकरंजी : मध्यमवर्गाच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वेगाने होत असलेल्या वाढीमुळे भारतात राजकीय व सामाजिक प्रारूप बदलले आहे. जगातील ...
इचलकरंजी : मध्यमवर्गाच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वेगाने होत असलेल्या वाढीमुळे भारतात राजकीय व सामाजिक प्रारूप बदलले आहे. जगातील अनेक देशांत गेल्या दोन-तीन दशकांत असे घडताना दिसत आहे. तसेच भारतातही वर्गाची जागा आता जातींनी व्यापली आहे. देशातील ४० कोटी मध्यमवर्गाचे सोशल प्रोफाईल बदलले आहे, हे भारतीय राजकारणाच्या बदलत्या दिशेमागील मुख्य वास्तव आहे. नव्याने पुन्हा सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या भाजप आघाडी सरकारला मिळालेल्या जनादेशामागे हेही एक महत्त्वाचे कारण आहे, असे मत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.
येथील समाजवादी प्रबोधिनीच्यावतीने आयोजित व्याख्यानात ‘भारतीय राजकारणाची बदलती दिशा’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जे. एफ. पाटील होते. यावेळी प्राचार्य आनंद मेणसे सहवक्ते होते.
यावेळी डॉ. चौसाळकर म्हणाले, लोकशाही व्यवस्थेत कोणताही जनादेश कायमस्वरूपी नसतो. तसेच या निवडणुकीत निवडणूक आयोगाने सक्षम सरकारी यंत्रणा - दळणवळणाची सुविधा, मत देणे व मोजणीसाठीची मशिनरी उपलब्ध असूनही निवडणूक प्रक्रिया दीर्घकालीन करणे आणि आचारसंहितेकडे काटेकोर लक्ष न देता सत्ताधार्जीण वर्तन करणे, ३७० कलम बदलण्यापासून ते घटना दुरुस्तीपर्यंतची प्रक्रिया, अशा विविध मुद्द्यांवर मांडणी केली.
प्राचार्य मेणसे म्हणाले, संसदीय लोकशाही पद्धतीऐवजी ‘नमो विरुद्ध रागा’ असे स्वरूप जाणीवपूर्वक आणले गेले; पण ते चुकीचे आहे. ती अध्यक्षीय पद्धती व हुकूमशाहीकडे नेणारी पावले आहेत. स्वायत्त संस्था मोडीत काढल्या जात आहेत. विरोधकांशी सुडाने वागले जात आहे. भारतीय राजकारणाची बदलती दिशा घातक आहे. ती बदलायची असेल, तर सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेऊन संघटितपणे व जागरूकपणे काम केले पाहिजे.
प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, डॉ. चिदानंद आवळेकर, अस्लम तडसरकर, प्रा. डी. डी. चौगुले, डॉ. सुनील कांबळे, सुनील इनामदार, आदींनी मनोगत व्यक्त केले.
चर्चासत्रास कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बेळगाव या जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी आभार
मानले.