कृष्णा दाबनलिकाप्रश्नी राजकीय द्वेष

By admin | Published: August 6, 2016 12:38 AM2016-08-06T00:38:55+5:302016-08-06T00:43:40+5:30

इचलकरंजीत कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडून जाब : मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले; स्वच्छतेबद्दल प्रश्नांची सरबत्ती

Political hatred of Krishna Dabnalakshani | कृष्णा दाबनलिकाप्रश्नी राजकीय द्वेष

कृष्णा दाबनलिकाप्रश्नी राजकीय द्वेष

Next

इचलकरंजी : निव्वळ राजकीय द्वेषापोटी कृष्णा नळ पाणी योजनेची दाबनलिका बदलण्याची २७ कोटी रुपयांची निविदा रद्द करणे म्हणजे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासारख्या जीवनावश्यक बाबींसाठी वेठीस धरण्याचा प्रकार आहे. त्यामुळे नगरपालिकेने दाबनलिका बदलण्याचे काम पूर्ण करावे. त्यासाठी पालिका प्रशासनाने जोरदार प्रयत्न करावेत. तसेच शहर स्वच्छता आणि रस्ते या प्रश्नांविषयी शुक्रवारी येथील राष्ट्रीय कॉँग्रेसचे पदाधिकारी व दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना धारेवर धरले.
मात्र, कृष्णा नळ पाणी योजनेची दाबनलिका बदलण्याच्या कामाचा निर्णय शासन स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगून मुख्याधिकारी
डॉ. रसाळ यांनी या समस्येला बगल दिली. तसेच रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून जे कोणी चुकीची कामे करणारे मक्तेदार असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असेही आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी कॉँग्रेसच्या शिष्टमंडळास दिले.
शहराला कृष्णा नदीतून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची ११ किलोमीटर लांबीची दाबनलिका बदलण्याच्या २७ कोटी रुपयांची निविदा रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली. त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी कॉँग्रेसचे पदाधिकारी व राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्याकडे गेले होते. त्यावेळी नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, माजी नगराध्यक्ष अशोकराव आरगे, उपनगराध्यक्ष महावीर जैन, गटनेते बाळासाहेब कलागते, नगरसेवक शशांक बावचकर, रवी रजपुते, आदींनी अनेक प्रश्न विचारून नगराध्यक्षांना भंडावून सोडले. अखेर मुख्याधिकाऱ्यांनी कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलण्याबाबत मी कोणतेही विधान केले नाही, असे उत्तर देऊन वेळ मारून नेली.
मात्र, कॉँग्रेस नगरसेवकांनी हा मुद्दा न सोडता वारणा नळ योजना मंजूर झाली असली तरी ती पूर्ण होण्यास चार-पाच वर्षांचा कालावधी लागेल. या काळात कृष्णा योजनेची दाबनलिका बदलली नाही, तर शहरास तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असेही उद्गार उद्विग्नपणे काढले. दरम्यान, शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि दैनंदिन कचरा उठाव होत नसल्याने आरोग्य व स्वच्छतेची समस्या निर्माण झाली असल्याबद्दल अनेकांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. या शिष्टमंडळामध्ये नगरसेवक संजय कांबळे, रणजित जाधव, संजय केंगार, तेजश्री भोसले, सुजाता भोंगाळे, बिस्मिल्ला मुजावर, सुरेखा इंगवले, शकुंतला मुळीक, सुमन पोवार, नरसिंह पारीक, आदींचा समावेश होता.

राजकीय द्वेषापोटी प्रस्ताव रद्द करण्याचा घाट
कृष्णा नळ पाणी योजनेची एकूण १८ किलोमीटर लांबीच्या दाबनलिकेपैकी सात किलोमीटर लांबीची दाबनलिका यापूर्वी नगरपालिकेने बदलली आहे. मात्र, उर्वरित ११ किलोमीटर लांबीची दाबनलिका अत्यंत कमकुवत झाली आहे. त्यामुळे या नलिकेत वारंवार मोठ्या प्रमाणावर गळती लागत असल्याने ती बदलण्याचा प्रस्ताव कॉँग्रेसने शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून मंजूर करून घेतला. २७ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी मिळाल्यानंतर केवळ राजकीय द्वेष, श्रेयवाद आणि व्यक्तिगत राजकीय स्वार्थापोटी ही योजना जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आली आणि आता तर राजकीय द्वेषापोटी दाबनलिका बदलण्याचाच प्रस्ताव रद्द करण्याचे सुरू असल्यामुळे अक्षरश: साडेतीन लाख लोकांच्या तोंडचे पाणी पळविले जात आहे, असे म्हणून कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांबरोबर नगरसेवकांनीही आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. मात्र, कॉँग्रेसने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, जनहिताच्या विरोधी असलेला हा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Web Title: Political hatred of Krishna Dabnalakshani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.