घालमेल नेत्यांची; चैनी झाली मात्र मतदारांची
By admin | Published: December 29, 2015 01:02 AM2015-12-29T01:02:09+5:302015-12-29T01:02:48+5:30
विधान परिषदेची ‘शाही सहल’: सहलीत घडले गमतीदार किस्से, काहींनी अनुभवला विमान प्रवास
कोल्हापूर : विधान परिषद निवडणूक ही नेत्यांची झाली असली तरीही चैनी मात्र मतदारांची झाली. दोन्हीही उमेदवारांकडून शाही सहली झाल्या; पण यामध्ये अनेकांचा थ्री, फाईव्ह स्टार हॉटेलचा आस्वाद आणि विमान प्रवासाचा पहिलाच योग असल्याने मतदार व त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद प्रमाणापेक्षा अधिक दिसून आला.
फाईव्हस्टार हॉटेलमध्ये नाष्टा करताना ‘अहो, माझी चटणी संपली, आणखी आणा हो’ असे जोरात ओरडून काही नगरसेविकांनी मागणी केल्याचे अनेक गंमतीदार किस्सेही घडले. या सहलीवरील मतदारांनी केलेल्या खरेदीचाही सर्व खर्च उमेदवारांवरच पडत असल्याने मतदारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी रग्गड खरेदी करून घेतली. या सहलीची चर्चा चांगलीच रंगली होती.
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे सतेज पाटील विरुद्ध अपक्ष महादेवराव महाडिक यांच्यात काट्याची लढत झाली. दोन्हीही उमेदवारांनी मतदार फुटाफुटीचे राजकारण होऊ नये म्हणून मतदारांना सहकुटुंब शाही सहली घडविल्या. या सहलीमध्ये केरळ-बंगलोर तसेच म्हैसूर-उटी अशा सहली झाल्या. मतदारांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा सहलीतच ठेवली होती. विशेष दक्षता म्हणून सर्व मतदार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून मोबाईल काढून घेतले होते.
एकाने विमान प्रवासासह दोन-दोन वातानुकुलित व्होल्वो ठेवल्या होत्या. यापैकी एका बसस्थानक परिसरातील दोन महिला नगरसेवकांनी आणि पूर्वभागातील नगरसेविका या तिघींनी ग्रुप करून सहलीत अनेक ठिकाणी रस्त्यावर व्होल्वो बस थांबवून दिसेल त्या वस्तू खरेदी करण्याचा सपाटा लावला. पहिलाच अलिशान प्रवास असल्याने त्याच्या गोंधळामुळे बसमधील मतदार त्रस्त बनले होते तर या तिघींनी खाद्यपदार्थ, शीतपेयाचा प्रमाणापेक्षा जादाच स्वाद घेतल्याने त्याचा कचरा बसभर झाला होता. या तिघींच्या गट्टीने अनेक हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांवरून वाद केल्याचीही चर्चा रंगली. सहलीत नगरसेविकांपेक्षा त्यांच्या पतीराजांचाच रूबाब होता.
बंगलोरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तर मतदार व त्यांच्या कुटुंबीयांनी ड्रायक्लिनचा दर पाहिल्यानंतर एका-एका मतदाराने किमान ७-८ कपड्यांचे जोड दिले. याठिकाणचा ड्रायक्लिनचा दर एका कपड्याच्या जोडसाठी किमान २५० रुपये होता. तोही खर्च उमेदवारांनी भागवला. हॉटेलमध्ये नाष्टा करतानाही ‘अहो, माझी चटणी संपली आहे, मला द्या’ असे एका नगरसेविकाने ओरडून मागितल्याने सारेच आवाक् झाले. बंगलोरच्या मॉलमधील खरेदीमुळे बसमध्येच सहित्याची अडचण होऊ लागली होती. (प्रतिनिधी)
‘लाडली’चा विमान प्रवास
पुण्यातून एका व्होल्वो बसने मतदारांना एकत्रित करून कोल्हापूरला आणले तर मतदारांसोबत आलेल्या सर्व कुटुंबीयांना स्वतंत्र गाडी करून कोल्हापूरला घरी पाठविले. यापैकी एका गट नेत्याच्या पत्नीने कोल्हापूरला येण्यापूर्वी पन्हाळा तालुक्यातील आपल्या माहेरीही गाडी वळविण्यास भाग पाडले. ती गावात पोहोचताच, तिच्या स्वागतासाठी गावकरी हजर होते तर आपली लेक विमान प्रवास करून आल्याचे कौतुक तिच्या आई-वडिलांनी जाहीरपणे केल्याचीही चर्चा महापालिकेत सुरू होती.
एकाचा दवाखान्याचा खर्च २२ हजार रुपये
एका जुन्या जाणकार नगरसेवकाने दिसेल त्या पदार्थाचा प्रमाणापेक्षा जादा आस्वाद घेतल्याने तो आजारी पडला. ते पाणी बाधले असे सांगत असले तरी घरातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा घरी येईपर्यंत त्यांच्या दिमतीला मिनरल वॉटर असताना हे पाणी बाधले कसे? असा अनेकांनी त्यांना प्रश्न केला. त्या ज्येष्ठ नगरसेवकांना बंगलोरमधून खास विमानाने पुण्यात आणून त्यांना पुण्यातच बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या रुग्णालयाचा एक दिवसाचा खर्च तब्बल बावीस हजार रुपये झाला.
सहलीत हॉटेलमध्ये थांबलेल्या सर्व उमेदवारांचा एकच प्रश्न नेत्यांना असायचा, ‘आमचे काय?’ यातून उमेदवारांनी हा प्रश्न निकालात काढल्यानंतर मतदार खूश झाले. मतदानाला परतत असताना मतदारांनी कुटुंबीयांना पुण्यातून कोल्हापूरपर्यंत ‘खास इनोव्हा’ गाडीने घरी पाठविले. मिळालेली ‘खुशाली’ मात्र त्यांनी कोणताही धोका नको म्हणून पुण्यातून हवाला, कुरिअरमार्फत घरपोच केली.