जिल्हा परिषदेसाठी राजकीय पक्षांचा गृहपाठ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2016 01:14 AM2016-09-14T01:14:47+5:302016-09-14T01:15:07+5:30
सध्या तरी स्वबळाची भाषा : आघाडीशिवाय पर्याय नसल्याने सर्वांच्याच हालचाली सावध
कोल्हापूर : जिल्हा परिषदेची निवडणूक जरी पुढील वर्षी होणार असली, तरी सर्वच पक्षांनी आतापासूनच गृहपाठाला सुरुवात केली आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आल्याने आता या दोन्ही पक्षांनाही जिल्हा परिषदेच्या सत्तेचे स्वप्न पडायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेस सत्ता टिकविण्यासाठी आणि राष्ट्रवादी सत्तेतील सहभागासाठी ताकद लावणार आहे. मात्र, स्वतंत्र लढण्यासाठी कुणीही कितीही उड्या मारल्या तरीही आघाडीशिवाय पर्याय नसल्याने या हालचालीही सावधपणे सुरू आहेत.
पुढील वर्षी मार्चमध्ये जिल्हा परिषदेच्या सध्याच्या सदस्यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने ६९ पैकी सर्वाधिक ३१ जागा मिळवत खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ची साथ घेत सत्ता संपादन केली. त्याआधीच्या पंचवार्षिकमध्ये पहिल्या अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीने काँग्रेसला सत्तेत वाटा दिला होता. मात्र, यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीला सत्तेकडे फिरकूही दिले नाही.
गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्णातील राजकारणामध्ये कमालीचा बदल झाला आहे. केंद्रात भाजप आणि राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. जिथे संधी मिळेल तेथे भाजपच्या कार्यक र्त्याला संधी देण्याची भूमिका असलेले राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य कसे वाढतील याच्या जोडणीत संघटनमंत्री बाबा देसाई यांना घेऊन लागलेले आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे ग्रामीण भागात पाच आमदार आहेत. त्यांच्या शक्तीवर शिवसेना आश्वासक आहे. जिल्ह्णाचे ताकदवान नेतृत्व असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक हे सध्या भाजपच्या जवळ आहेत.
राष्ट्रवादी आणि दोन्ही काँग्रेस आपले सर्वाधिक सदस्य कसे निवडून येतील यासाठीच्या नियोजनात आहेत. जनसुराज्य, स्वाभिमानी व अन्य छोट्या-मोठ्या आघाड्या, गट हे कुणाबरोबर तरी संगत करूनच या राजकारणामध्ये सक्रिय राहणार आहेत.
करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तीन तालुक्यांतील कुणाचे सदस्य जास्त संख्येने निवडून येतात यावर सत्तेची गणिते अवलंबून आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्राथमिक चाचपणी सुरू केली आहे. अजून आरक्षण पडलेले नाही. एकदा आरक्षण पडले की मग पुढच्या हालचाली वेगावणार आहेत.