मनपा यंत्रणेवर राजकीय दबाव
By admin | Published: August 4, 2015 12:58 AM2015-08-04T00:58:19+5:302015-08-04T00:58:19+5:30
दोन्ही काँग्रेसचा आरोप : अधिकाऱ्यांची जबाबदारी काढून घेण्याची मागणी करणार
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावर शहरात सोमवारी तत्काळ प्रतिक्रिया उमटली. काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी सायंकाळी आयुक्त पी. शिवशंकर यांना धारेवर धरले. महापालिका निवडणूक यंत्रणेवर कोणाचा तरी दबाब असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तसेच चुकीच्या पद्धतीने कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करावे,अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचेही सांगण्यात आले. पत्रकार परिषद संपताच काहीशा गोंधळेल्या मन:स्थितीत तणावाखाली असलेले आयुक्त पी. शिवशंकर तातडीने मनपा कार्यालयातून बाहेर पडले. निवडणूक कार्यालयात त्यांनी धाव घेतली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, उपमहापौर ज्योत्सना पवार- मेढे, प्रा.जयंत पाटील, विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव, नगरसेवक विनायक फाळके, महेश गायकवाड आदींनी आयुक्तांची भेट घेतली आणि आरक्षण बदलाच्या निर्णयाबद्दल आपला राग व्यक्त केला. (प्रतिनिधी)
निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे लाटकर यांनी सांगितले. ज्या कर्मचाऱ्यांनी या कामात हलगर्जीपणा केला आणि ज्यांच्यामुळे ही नामुष्की ओढावली त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राजकीय दबावाने नवा निर्णय
कोणाच्या तरी राजकीय दबावामुळे प्रशासनाने नव्याने आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप राजेश लाटकर व जयंत पाटील यांनी केला. आयोगाच्या निर्देशांची माहिती का करून घेतली नाही? निरीक्षकांना सोडतीवेळी हजर ठेवण्याची विनंती का केली नाही, असे प्रश्न उपस्थित करून आयुक्तांना निरूत्तर केले.
प्रभाग रचनाही चुकीची : पाटील
मनपाने केलेली प्रभाग रचना आणि आरक्षणाची पद्धत अत्यंत चुकीची आहे, असा आक्षेप प्रा.जयंत पाटील यांनी घेतला आहे. जर नव्याने प्रभाग रचना केली असेल आणि एकेका प्रभागाचे तीन-चार तुकडे झाले असतील तर २००५ व २०१० सालच्या निवडणुकीचे आरक्षण विचारात घेणे योग्य नाही. निवडणूक यंत्रणेचा हा गलथानपणा आहे, असे प्रा. पाटील म्हणाले. इंद्रजित बोंद्रे यांच्या प्रभागाचे तीन नव्या प्रभागात विभाजन केले आहे. मग तिन्ही प्रभागांवर अनुसूचित जातीचे आरक्षण कसे टाकले, असा सवाल त्यांनी केला.