कागलमधील राजकीय संदर्भ बदलले

By admin | Published: March 24, 2017 12:01 AM2017-03-24T00:01:43+5:302017-03-24T00:01:43+5:30

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचे राजकारण : मंडलिक-मुश्रीफ यांच्यात जवळीक, तर संजय घाटगेंचा दुरावा

Political references in Kagal were changed | कागलमधील राजकीय संदर्भ बदलले

कागलमधील राजकीय संदर्भ बदलले

Next

जहाँगिर शेख -- कागल --जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कोल्हापूर तालुक्याच्या राजकारणावर राजकीय उलाढालींचा थेट परिणाम कागल तालुक्याच्या राजकारणावर झाला आहे. प्रा. संजय मंडलिकांनी दोन्ही काँग्रेसशी केलेली हातमिळवणी योग्य की अयोग्य याच्याबद्दल मतमतांतरे व्यक्त होत असतानाच संजय घाटगेंनीही ‘महाडिक कॅम्प’मध्ये केलेला शिरकाव याचीही चर्चा रंगली आहे. जरी अध्यक्षपदाच्या निवडीत अपयश आले असले तरी मुश्रीफ-मंडलिक गटातील जवळीक यामुळे आणखीन घट्ट झाली आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-सेना हे पक्षीय झेंडे जरी या निवडीवेळी नाचविले गेले असले तरी यात सहभागी प्रत्येक नेत्याला आपली पुढील राजकीय वाटचालच महत्त्वाची होती. त्यामुळे कोणत्या नेत्याने कोणत्यातरी पक्षासाठी त्याग केला, हे म्हणणे चुकीचे आहे. लोकसभा, विधानसभा, गोकूळ दूध संघ, जिल्हा बँक अशा सत्ताकेंद्रांच्या लाभापोठी पाठिंब्याची गणिते घातली गेली. मग, त्याला कागल तालुका अपवाद असण्याचे कारण नाही. आमदार मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेतृत्व करतात. त्यांना पक्षाच्या हितासाठी काँग्रेस आघाडीचा अध्यक्ष करण्यासाठी कंबर कसावी लागली. दहा सदस्यांत चार सदस्य त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील आहेत. तर प्रा. संजय मंडलिकांना लोकसभा निवडणुकीत ‘महाडिक गट’ शत्रुस्थानी आहे. भलेही ते सध्या भाजपबरोबर असले आणि संजय मंडलिक हे सेनेचे संपर्कप्रमुख असले तरी पुढची लढाई ही त्यांच्याबरोबरच असल्याने त्यांना विरोधाची भूमिका घेणे ईष्ट होते, तेच त्यांनी केले. राहिला प्रश्न संजय घाटगेंचा? त्यांना पी. एन. पाटीलही जवळचे होते. कल्लाप्पाण्णा आवाडेंना काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मिळू न देण्यात व घाटगेंना एक जिल्हाध्यक्ष करण्यात पी. एन. पाटीलच कारणीभूत होते. मात्र, तालुक्याच्या बदलत्या राजकारणाचा संदर्भ घेत मंत्री चंद्रकांतदादांच्या अधिक जवळ जाणे यालाच प्राधान्य देणे संजय घाटगेंनी पसंत केले. त्यासाठी ते ‘महाडिक कॅम्प’मध्ये घुसले आहेत. एकूणच या तिन्ही नेत्यांनी आपल्या गटाच्या हिताचेचे निर्णय घेतले आहेत. यामुळे पुढील काळात कागलचे राजकारण कोणते वळण घेते याची उत्सुकता आहे. तूर्त या निमित्ताने मुश्रीफ-मंडलिकांमधील संवाद अधिकच वाढला आहे. संजय घाटगे हे संजय मंडलिकांपासून दुरावत चालले आहेत.

कागलमध्ये लाल दिव्याची गाडी ?
नूतन अध्यक्षा शौमिका महाडिक या कागलच्या घाटगे घराण्यातील आहेत. येथील यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये आमदार अमल महाडिक यांचा सत्कार झाला, तेव्हा त्यांनी अमल यांना अध्यक्षपद मिळू दिले नव्हते. तेव्हा मनावर झालेला आघात भाषणात सांगितला होता. माहेरच्या मंडळींसमोर मन मोकळे केले होते. आज त्या स्वत:च अध्यक्षा झाल्या आहेत. आता त्या सत्कारासाठी लालदिव्याच्या गाडीतून येणार आहेत.... विशेष म्हणजे शौमिका महाडिक यांचे बंधू अखिलेशराजे घाटगे यांनी कागल नगरपालिकेत तिसरी आघाडीही तयार केली होती.


संजय घाटगेंचा रोख कोणाकडे ?
कागल-मूरगूड नगरपालिका, आता झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रा. संजय मंडलिकांचे नेतृत्व प्रमाण मानून वाटचाल करणाऱ्या संजयबाबा घाटगेंनी अध्यक्षपदाच्या निवडीत स्वतंत्र अशी भूमिका घेतली. याला अनेक कारणे आहेत. ‘मात्र, सत्तेसाठी कोणाचे बूट चाटणार नाही’ ही त्यांची अध्यक्षपदाच्या निवडीनंतरची प्रतिक्रिया तालुक्यात फारच चर्चेत आहे. संजय घाटगेंचा या वाक्यामधील रोख कोणाकडे? हीच चर्चा सध्या सुरू आहे.

Web Title: Political references in Kagal were changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.