राजकीय संन्यास नाही; योग्यवेळी सक्रिय : प्रकाश आवाडे, काही काळ अलिप्त राहायच ठरवलेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:28 AM2018-04-06T00:28:23+5:302018-04-06T00:28:23+5:30
इचलकरंजी : मी काही राजकीय संन्यास घेतलेला नाही. काही काळ अलिप्त राहायच ठरवलेय. योग्य वेळी राजकारणात सक्रिय होईनच,
इचलकरंजी : मी काही राजकीय संन्यास घेतलेला नाही. काही काळ अलिप्त राहायच ठरवलेय. योग्य वेळी राजकारणात सक्रिय होईनच, असा विश्वास माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. मात्र, सध्याच्या सरकारकडून दाखविण्यात येणाऱ्या यंत्रमाग उद्योगाबाबतच्या उदासीनतेवर त्यांनी जोरदार टीका केली.
येथील पत्रकार कक्षात आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमात आवाडे अनौपचारिकपणे पत्रकारांशी बोलत होते. तुम्ही ‘ताराराणी’चे की कॉँग्रेसचे, या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली; पण यावेळी आवाडेंबरोबर राष्टÑीय कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे व नगरपालिकेतील कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे आवाडे कॉँग्रेसचेच असल्याचे यावर शिक्कामोर्तब झाले.
सर्वसामान्य जनतेसमोर सध्या अनेक समस्या उभ्या असताना सरकारकडून फक्त पोकळ आश्वासनापलीकडे काहीही केले जात नाही. महागाई, पेट्रोल-डिझेलचे उच्चांकी दर, शेतीमालाला उत्पादन खर्चाइतकाही न मिळणारा भाव, रेशनिंगवरून गायब झालेले धान्य, अशा विविध समस्यांनी जनता ग्रासली आहे, असेही आवाडे यांनी स्पष्ट केले.
राज्यात शेतीखालोखाल रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग आहे. या उद्योगातील मंदीवर सरकार कोणतेच उपाय करीत नाही. सवलतीत वीजदर आणि यंत्रमाग उद्योगासाठी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात पाच टक्क्यांचे अनुदान दिले, तर रोजगाराभिमुख असलेल्या या उद्योगात निश्चितपणे ऊर्जितावस्था येईल. पण वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी, वीजदर सवलत व यंत्रमागधारकांना व्याजदराचे अनुदान सरकार देईल, असे सांगून पावणेदोन वर्षे उलटली; पण पदरात काहीच पडले नाही, असे सांगत माजी मंत्री आवाडे यांनी सरकार पोकळ आश्वासने देत असल्याबद्दल टीका केली.
यंत्रमाग कामगारांची शासनाकडून क्रूर चेष्टा
यंत्रमाग उद्योगात तीन लाखांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. यंत्रमाग कामगारांसाठी माथाडी बोर्डासारखे कल्याणकारी मंडळ स्वतंत्रपणे स्थापन करून ते ताबडतोब कार्यान्वित करणे आवश्यक असताना १२४ उद्योग-व्यवसायातील असंघटित कामगारांच्या कल्याणकारी मंडळात यंत्रमाग कामगारांचा समावेश करण्याची घोषणा करून राज्य शासनाने या उद्योगाची आणि कामगार वर्गाची कू्रर चेष्टा केली आहे, असा आरोप आवाडे यांनी केला.