राजकीय, सामाजिक पदांचा लोकहितासाठीच वापर : कल्लाप्पाण्णा आवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:47 AM2019-05-13T00:47:44+5:302019-05-13T00:47:50+5:30
कोल्हापूर : विश्वासार्हता आणि प्रामाणिकता हीच आवाडे कुटुंबाची ताकद आहे. याच विश्वासार्हतेमुळेच राजकारण, समाजकारणात पदे मिळाली. जे मिळाले त्याचा ...
कोल्हापूर : विश्वासार्हता आणि प्रामाणिकता हीच आवाडे कुटुंबाची ताकद आहे. याच विश्वासार्हतेमुळेच राजकारण, समाजकारणात पदे मिळाली. जे मिळाले त्याचा उपयोग लोकांसाठी केला. त्याची दखल समाजाने नेहमीच घेतली आहे, असे भावोद्गार माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी काढले.
श्री लक्ष्मीसेन जैन मठातर्फे रविवारी १००८ श्री आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेकाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने कल्लाप्पाण्णा आवाडे व इंदुमती आवाडे या दाम्पत्याला ‘आदर्श दाम्पत्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. मठातर्फे पहिला जीवनगौरव पुरस्कार प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांना देण्यात आला. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी जीनकांची मठ तमिळनाडू, त्यांचे उत्तराधिकारी इलय भट्टारक लक्ष्मीसेन महास्वामी व डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी जैनमठ कोल्हापूर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सत्काराला उत्तर देताना आवाडे म्हणाले, पत्नी इंदुमतीने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ दिल्याने आज सामाजिक, राजकीय क्षेत्रात कुटुंबातही समाधानाचे आयुष्य जगत आहे. तिने केलेला त्याग व दिलेले संस्कार यामुळेच आवाडे कुटुंबाची प्रेमाची परंपरा निर्माण झाली. मुले, नातवंडे ही परंपरा पुढे नेत असल्याचे समाधान वाटते. यावेळी आवाडे कुटुंबीयातील माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांच्यासह महापालिकेच्या महापौर सरिता मोरे उपस्थित होत्या.
दरम्यान, या सोहळ्याची सुरुवात सकाळी सहा वाजता मंगलवाद्य घोष, ध्वजारोहण व पार्श्वनाथ तीर्थंकरांच्या पंचामृताभिषेकाने झाली. सकाळी दहा वाजता वय वर्षे सात पूर्ण केलेल्या मुला-मुलींचे मौजी बंधन व व्रत संस्काराचा धार्मिक सोहळा झाला. यावेळी पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन, सुरेश रोटे यांनी सन्मानपत्रांचे वाचन केले. धनंजय मगदूम, अनिल सांगावे, राजू उपाध्ये यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री आदिनाथ तीर्थंकरांच्या मठाच्या प्रांगणातील २८ फूट उंच अमृतशिलामय बृहनमूर्तीवर आवाडे कुटुंबीयांच्या हस्ते व लक्ष्मीसेन महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता महामस्तकाभिषेक झाला. दुग्धाभिषेक, इशूरस, कलक चुर्ण, कुंकू, कंपाय द्रव्य, हळदचा अभिषेक तीर्थंकरांच्या मूर्तीवर घालण्यात आला. सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती.