महाविकास आघाडीचा पाठिंबा नाकारल्यानेच राजू शेट्टींची राजकीय आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 05:28 PM2024-06-05T17:28:56+5:302024-06-05T17:29:26+5:30
कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी घातलेल्या पायघड्या धुडकावून ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी एकला चलोच्या घेतलेल्या भूमिकेनेच त्यांची ...
कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी घातलेल्या पायघड्या धुडकावून ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी एकला चलोच्या घेतलेल्या भूमिकेनेच त्यांची राजकीय आत्महत्या केली, असेच म्हणावे लागेल. निवडणुकीच्या अगाेदर संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव ‘हातकणंगले’तील निवडणूक शेट्टी हे एकतर्फी मारतील, असेच वातावरण होते. मात्र, मागील तीन निवडणुकांप्रमाणे यावेळेलाही सामान्य माणूस आपल्यासोबत राहील, या आत्मविश्वासाने आघाडीने दिलेला हात अक्षरश: लाथाडला आणि तिथेच शेट्टींचा घात झाला. पहिल्या फेरीपासून ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप निश्चित व्हायच्या अगोदर ‘हातकणंगले’राजू शेट्टींना सोडूनच चर्चा सुरू होती. ही जागा शेट्टींना सोडायचीच म्हणून तिथे आघाडीकडून उमेदवाराचीही तयारी केली नव्हती. शेट्टी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे व काही काँग्रेस नेत्यांशी चर्चाही केल्या होत्या. धैर्यशील माने यांच्याबद्दलची नाराजी आणि आघाडीची ताकदीमुळे येथे शेट्टी एकतर्फी निवडणूक मारणार, हे निश्चित होते. पण, मागील निवडणुकीत आघाडीसोबत गेलो आणि पराभव झाला. साखर कारखानदारांसोबत गेल्याने आपला पराभव झाल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली.
त्यातही उद्धवसेना चालते; पण दोन्ही काँग्रेस आपणाला चालत नसल्याचे उघड वक्तव्य करत आघाडी व महायुतीपासून समान अंतरावर असल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांची सहानूभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, येथेच त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला. दोन्ही कॉग्रेसचे नेते अधिक आक्रमक झाले, कोणत्याही परिस्थित उध्दवसेनेने येथे उमेदवार द्यावा, असा आग्रह धरला. त्यातूनच सत्यजीत पाटील-सरुडकर यांचा पत्ता उध्दव ठाकरे यांनी काढला आणि बघता बघता ‘हातकणंगले’चे वारे फिरले.
विशेष म्हणजे सरुडकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या विजयाचे भाकीत केले जात होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्या आठवड्यात सरुडकर आणि शेट्टी यांच्या मध्येच फाईट राहिली; पण शेवटच्या टप्यात धैर्यशील माने यांनी लावलेल्या जोडण्यांमुळे शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
पदाधिकाऱ्यांचा सल्लाही धुडकावला..
स्वबळावर लढण्यासारखी फौज स्वाभिमानी संघटनेकडे शिल्लक राहिली नाही. त्यामुळे आघाडी बिनशर्त सोबत बोलवत असेल तर जाऊया, असा सल्ला संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी शेट्टींना दिला होता. पण, चार-दाेन कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे एकला चलो रे ची भूमिका घेतली आणि पराभवाचे तोंड बघावे लागले.
राजू शेट्टी यांचा शिरोळ व वाळवा तालुक्यावर भरवसा होता. शिरोळमध्ये झालेल्या मतांपैकी किमान १ लाख १० हजार मते मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती. पण, त्यांच्या होमपिचवरच त्यांचा मोठा फटका बसला. वाळव्यानेही अपेक्षित साथ दिली नाही.
मानेंनी घेतली शेट्टींची मते
शेवटच्या टप्यात धैर्यशील माने यांनी लावलेल्या जोडण्यांमुळे सत्यजीत पाटील यांची मते ते कमी करणार, असे गणित राजू शेट्टी यांचे होते. मात्र, प्रत्यक्षात माने यांनी शेट्टी यांची मतेच घेतले.
शेट्टींच्या पराभवाची प्रमुख कारणे..
- गेल्या पाच वर्षांत संघटनेतील सक्रीय कार्यकर्त्यांची कमी झालेली संख्या
- ऊस दर आंदोलनाबद्दल शेतकऱ्यांच्या मनातच असलेली संभ्रमावस्था
- संघटनेचे बळ कमी झाले असताना स्वबळाचा घेतलेला आत्मघातकी निर्णय
- जातीय राजकारणाचा झालेला प्रचार
शेट्टीच्या आतापर्यंतच्या निवडणूका..
२००९ - अपक्ष : मते - ४ लाख ८१ हजार २५ (९५ हजार ६० मतांनी विजयी)
२०१४- महायुती : मते - ६ लाख ३९ हजार १९१ (१ लाख ७७ हजार ८१० मतांनी विजयी)
२०१९ - महाविकास आघाडी - ४ लाख ८७ हजार २७६ ( ९५ हजार ७६८ मतांनी पराभव)
२०२४ - अपक्ष : मते - १ लाख ४० हजार ( सुमारे २ लाख ४५ हजारांनी पराभव)