चंदगड तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीसाठी राजकीय खलबत्ते जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 02:48 PM2020-12-25T14:48:10+5:302020-12-25T14:49:49+5:30
gram panchayat Chandgad kolhapur- चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावा-गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शासनाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करणार निवडणुकीतील ईर्ष्याच कमी झाली आहे. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून गल्लीबोळातील कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
नंदकुमार ढेरे
चंदगड-चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावा-गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शासनाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करणार निवडणुकीतील ईर्ष्याच कमी झाली आहे. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून गल्लीबोळातील कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
तालुक्यात राजकीय पक्षापेक्षा गटाच्या राजकरणाला महत्त्व आहे. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी व वैयक्तिक भेटीगाठी घेवून आपली भूमिका मतदारापर्यंत पोहोचविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार राजेश पाटील यांच्या म्हाळेवाडी व माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या बसर्गे, जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या कोवाड तर माजी सभापती शांताराम पाटील यांच्या धुमडेवाडी, माजी सभापती भरमाण्णा गावडे यांच्या हलकर्णीसह कालकुंद्री, राजगोळी बुद्रूक, मांडेदुर्ग, दाटे, हजगोळी, किणी, मलतवाडी, नांदवडे, शिनोळी व तुडये या राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावात निवडणूक होत असल्याने लोकप्रतिनिधींचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तालुक्यात १५ वर्षापूर्वी भरमू पाटील गट विरुद्ध नरसिंगराव पाटील गट अशी लढत व्हायची. कालांतराने दौलत कारखान्याच्या संघर्षातून गोपाळराव पाटील हे नवे नेतृत्व उदयाला आले. अलिकडच्या दशकात संभाजीराव शिरोलीकर, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अप्पी पाटील, शिवाजी पाटील ही नवी नेतृत्वे उदयाला आली आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
हजगोळी, हलकर्णी, होसूर, इब्राहिमपूर, कळसगादे, कानडी, करेकुंडी, केरवडे-वाळकुळी, किणी, मलतवाडी, मुगळी, नागवे-ईनाम, कोळींद्रे, नांदवडे, पुंद्रा, सुरुते, शिनोळी खुर्द, तुडये, चिंचणे, बुक्कीहाळ, देवरवाडी, ढोलगरवाडी, धुमडेवाडी, जांबरे, कौलगे, किटवाड, माडवळे, म्हाळेवाडी, पाटणे, सुंडी, तावरेवाडी, कालकुंद्री, कोवाड, राजगोळी बुद्रूक, मांडेदुर्ग, आसगाव, बसर्गे, बागिलगे, बोंजुर्डी, दाटे, दिंडलकोप, घुल्लेवाडी या गावांत निवडणुका होत आहेत.