पाटाकडील तालमीकडे नेताजीचषक
By Admin | Published: April 13, 2017 12:46 AM2017-04-13T00:46:29+5:302017-04-13T00:46:29+5:30
फुलेवाडी संघावर ३-० ने मात; हृषिकेश मेथे-पाटीलचे दोन गोल
कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर ३-० अशी मात करत नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अखेरच्या सामन्यात पाटाकडीलच्या हृषिकेश मेथे-पाटीलने दोन गोल नोंदविले.
शाहू स्टेडियम येथे बुधवारी पाटाकडील ‘अ’ व फुलेवाडी या संघात अंतिम सामना झाला. सामन्याच्या प्रारंभी ‘फुलेवाडी’कडून रोहित मंडलिक, तेजस जाधव, जयसन वाझ, सिद्धेश यादव, सूरज शिंगटे यांनी जोरदार चढाई करत पाटाकडील ‘अ’ च्या गोलक्षेत्रात दबाव निर्माण केला. रोहित मंडलिक, तेजस जाधव यांच्या दोन संधी तर हमखास गोल अशा होत्या. मात्र, फु लेवाडी संघाकडून आज नशीब नसल्याने अगदी गोलपोस्टमधून अक्षरश: या दोन संधी निघून गेल्या. ‘पाटाकडील’कडून हृषिकेश मेथे-पाटील, ओंकार जाधव, ओंकार मोरे, असिफउल्ला खान, रणजित विचारे, रूपेश सुर्वे यांनी तितक्याच वेगवान चाली करत गोल करण्याचे प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. दोन्ही संघांकडून पूर्वार्धात गोल करून आघाडी घेण्याच्या अनेक संधी वाया गेल्या.
उत्तरार्धात ४३ व्या मिनिटास पाटाकडील‘अ’ ला मिळालेल्या कॉर्नर किकवर हृषिकेश मेथे-पाटील याने हेडद्वारे अचूक गोल नोंदवत सामन्यात १-० अशी आघाडी निर्माण केली. या गोलनंतर ‘फुलेवाडी’कडून अनेक चढाया केल्या. मात्र, पाटाकडीलच्या भक्कम बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. ‘पाटाकडील’कडून हृषिकेश मेथे-पाटीलने मारलेल्या फटका फुलेवाडी गोलरक्षक निखिल खाडे याने चपळाईने बाहेर काढला. ८० व्या मिनिटास फुलेवाडी संघ आॅफसाईड पकडण्याच्या प्रयत्न करत असताना ‘पाटाकडील’कडून प्रवीण जाधवने गोलरक्षकाला चकवत गोल नोंदवला. त्यामुळे सामन्यांत २-० अशी आघाडी निर्माण झाली. शेवटच्या जादा वेळेत हृषिकेश मेथे-पाटीलने मैदानी गोलची नोंद करत सामन्यात ३-० अशी आघाडी निर्माण केली. अखेरपर्यंत हीच गोलसंख्या कायम ठेवत पाटाकडील‘अ’ने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेच्या मध्यंतरात आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
स्पर्धेतील विजेत्या पाटाकडील ‘अ’ संघास विजेतेपदाचा चषकासह रोख पन्नास हजार व उपविजेत्या फुलेवाडी संघास २५ हजार रोख व चषक श्री शाहू छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, के.एस.ए. पदाधिकारी माणिक मंडलिक, माजी नगरसेवक बबन कोराणे, रविकिरण इंगवले, उद्योजक चंद्रकांत यादव, सुजित चव्हाण, राजू साळोखे, राजू राऊत, अजित चव्हाण, विजय साळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्कृष्ट खेळाडू
फॉरवर्ड- हृषिकेश मेथे-पाटील, गोलरक्षक - उत्कर्ष देशमुख, हाफ- ओंकार पाटील (तिघेही पाटाकडील ‘अ ’), डिफेन्स- सिद्धेश यादव, मालिकावीर - तेजस जाधव (दोघेही फुलेवाडी संघ).
नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेल्या पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघास विजेतेपदाचा चषक श्री शाहू छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, बबन कोराणे, अजित चव्हाण, रविकिरण इंगवले, सुजित चव्हाण, राजू साळोखे, माणिक मंडलिक आदी उपस्थित होते.