राजकारणी, बिल्डर थकबाकीदारांच्या यादीत, १५ दिवसांनंतर महापालिका करणार मिळकती जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 06:12 PM2018-09-22T18:12:36+5:302018-09-22T18:18:12+5:30
घर आणि कार्यालयाचे विजेचे बिल, मोबाईलचे बिल, कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते अगदी न चुकता वेळेवर भरणारे तथाकथित राजकारणी, बिल्डर, विविध संस्था कोल्हापूर महानगरपालिकेचे हजारांतील पाण्याचे बिल भरण्यास मात्र कचरत असल्याची बाब शनिवारी समोर आली.
कोल्हापूर : घर आणि कार्यालयाचे विजेचे बिल, मोबाईलचे बिल, कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते अगदी न चुकता वेळेवर भरणारे तथाकथित राजकारणी, बिल्डर, विविध संस्था कोल्हापूर महानगरपालिकेचे हजारांतील पाण्याचे बिल भरण्यास मात्र कचरत असल्याची बाब शनिवारी समोर आली.
दुसऱ्यांना कायद्याची भीती घालणारे पोलीस खाते, सरकारी महसुलाच्या वसुलीकरिता प्रसंगी जप्तीच्या नोटिसा पाठविणारी सरकारी कार्यालये, एवढेच काय, तर आपली पाणीपट्टी भरली नाही म्हणून महापालिकेच्या मुख्य कार्यालयाचे वीज कनेक्शन तोडायला सरसावलेल्या पाटबंधारे विभागानेदेखील महापालिकेची पाणीपट्टी थकविण्यात बाजी मारली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागाने शनिवारी शहरातील ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या १०१२ थकबाकीदारांची नावेच वृत्तपत्रातून जाहीर केली आहेत. त्यातून अनेक तथाकथित बडेजाव मारणाऱ्या मंडळींचा बुरखा फाडण्यात आलेला आहे. त्यांना त्यांची थकबाकी भरण्यास १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्या मुदतीत त्यांनी जर थकबाकी भरली नाही तर त्यांच्या मिळकती जप्त करून त्याच्या विक्रीतून या बिलाची थकबाकी वसूल केली जाणार आहे.
मोबाईल कनेक्शन बंद होईल, विजेचे कनेक्शन बंद करतील या भीतीपोटी शहरवासीय न चुकता, अगदी वेळेवर बिले भरतात. त्यात कसलीही हयगय केली जात नाही.
मात्र महानगरपालिकेचा घरफाळा, पाणीपट्टी भरायची म्हटली की त्यांचे हात आखडतात. महानगरपालिका आपलीच आहे, आपल्याच सेवेकरिता आहे, याचा त्यांना विसर पडतो. शनिवारी जी थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यात सर्वसामान्यांची संख्या अगदीच नगण्य असली तरी त्यांत राजकारणी, बिल्डर, मोठे व्यावसायिक, व्यापारी, हौसिंग सोसायटी, शासकीय कार्यालयांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.
थकबाकीदारांच्या यादीत निवेदिता संभाजीराव माने - ५८,७६५, दिग्विजय खानविलकर- ५९,१८८, दीपा दिलीपराव मगदूम - ७५,९४१, पंडितराव सडोलीकर - ५९,१६८ , सुभाषराव नियोगी - ६१,७८५, प्रकाश शेलार - १२३५११, राजन हारुण फरास - १४४७१२, राधेशामजी शर्मा - ५३,३५६, मनोहर शर्मा - ८५,०८८, नागोजीराव अजितसिंह पाटणकर - ५६,४९९, व्ही. एच. अपराध - १६३८७८, दिलीप अतिग्रे - ५७,७७०, भरत फाळके - ६८,६९० यांचा समावेश आहे.
शालिनी पॅलेस- १८८६११, अयोध्या हौसिंग सोसायटी- १२५११२, जवाहरनगर हौसिंग सोसायटी- ६१,२२३, छत्रपती शाहू जलतरण तलाव (आर.एल. तावडे)- ३५ लाख ०१ हजार ७१२ आणि ८१ हजार ५०९, मयूर दूध संघ- ५३,८८८ यांसह अनेक संस्थांचा थकबाकीदारांच्या यादीत समावेश आहे.
महानगरपालिका हद्दीत यायला नको म्हणणाऱ्या काही ग्रामपंचायतींनी पाणी घेतले; पण त्याचे बिलच भरलेले नाही. अशा थकबाकीदारांच्या यादीत गांधीनगर, हणमंतवाडी, शिंगणापूर, वळिवडे, उचगाव, बालिंगा, नागदेववाडी, सरनोबतवाडी, चिंचवाड यांचा समावेश आहे.
सीपीआर रुग्णालयाची थकबाकी सर्वाधिक म्हणजे ४ कोटी २७ लाख, ५९ हजार ३९७ आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळ - ११२०४५, लक्ष्मीपुरी पोलीस लाईन- १९ लाख ४२ हजार ९७३, जुना बुधवार पोलीस लाईन- १७ लाख ५७ हजार ८९२ व ११ लाख ३८ हजार ६१३, नवीन सर्किट हाऊस- ५० लाख ८८ हजार ३१७, उपअभियंता पंचगंगा पाटबंधारे विभाग- ११ लाख ६४ हजार ०७९, रेल्वेस्थानक - ७ लाख ८० हजार ५७० एवढी थकबाकी आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थानही थकबाकीदार
ज्यांनी कायद्याने व्यवहार चालावा यासाठी आग्रह धरायचा असतो, ते जिल्हा प्रशासनही थकबाकीत आहे. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाचे ३ लाख ७५ हजार ८३४ रुपयांचे पाण्याचे बिल थकले आहे. करवीर प्रांत कार्यालय - १ लाख १९ हजार ६९८ आणि ९४ हजार ७५१, करवीर तहसीलदार कार्यालयाचे ८२ हजार १६८ रुपयांचे बिल थकले आहे.