...तर राजकारणातही खिलाडूवृत्ती येईल - अरुण नरके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:03 AM2018-12-15T00:03:21+5:302018-12-15T00:03:45+5:30
खेळामुळे खिलाडूवृत्ती येते. हार-जित पचविण्याची ऊर्जा तयार होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनाही एखादा खेळाडू असल्याची अट घालावी.
कोल्हापूर : खेळामुळे खिलाडूवृत्ती येते. हार-जित पचविण्याची ऊर्जा तयार होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनाही एखादा खेळाडू असल्याची अट घालावी. त्यामुळे खेळाडू राजकारणी झाल्याने राजकारणातही खिलाडूवृत्ती येईल, असे प्रतिपादन ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी केले.
कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनतर्फे गुरुवारी सायंकाळी १६ वर्षांखालील जिल्हा संघातील खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर होते.
स्पर्धेत १९ वर्षांखालील जिल्हा क्रिकेट महिला संघाने ताराराणी चषक स्पर्धेत उपविजेतेपद मिळविल्याबद्दल महिला खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू रघुनाथ पिसे यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नरके यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सचिव केदार गयावळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नरके यांच्या मानपत्राचे वाचन निसार मुजावर यांनी केले. अजित मुळीक यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, उपाध्यक्ष चेतन चौगुले, रवींद्र उबेरॉय, बापूसाहेब मिठारी, रमेश हजारे, जनार्दन यादव, मधुकर बामणे, विश्वजित महागांवकर, रोहन भुईवर यांच्यासह खेळाडू, पालक, असोसिएशनचे सभासद उपस्थित होते.
महाडिक यांना मीच ‘गोकुळ’मध्ये आणले
आनंदराव पाटील-चुयेकर यांनी मला ‘गोकुळ’मध्ये आणले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोकुळ’ कार्यालयात आणून आम्ही त्यांचा सत्कार करीत होतो. तेजस्विनी सावंत, वीरधवल खाडे यांनाही मी शोधले. एवढेच काय, महादेवराव महाडिक यांनाही मीच ‘गोकुळ’मध्ये आणले. नंतर त्यांनी ‘गोकुळ’ ताब्यातच घेतले. आता ते माझे नेते आहेत. महादेवराव महाडिकदेखील चांगले कुस्तीपटू आहेत, असे प्रतिपादन नरके यांनी केले.
कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनतर्फे गुरुवारी १६ वर्षांखालील जिल्हा संघातील खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांच्या सत्कार समारंभप्रसंगी अरुण नरके, बाळ पाटणकर, रघुनाथ पिसे, रवींद्र उबेरॉय, ऋतुराज इंगळे, चेतन चौगुले, आदी मान्यवर उपस्थित होते.