मल्टिस्टेट’वरून राजकारणाला उकळी;नेत्यांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:06 AM2018-09-17T01:06:58+5:302018-09-17T01:07:01+5:30
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सर्वसाधारण सभेतील संघ ‘मल्टिस्टेट’ करण्याच्या विषयावरून जिल्ह्यातील राजकारणाला उकळी फुटली आहे. सत्ताधारी विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून याला आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांचीही किनार आहे. संघाकडून या विषयावरून होणाऱ्या संपर्क सभा व त्या सभेत होणारा जोरदार विरोध यामुळे सर्वसाधारण सभेआधीच वातावरण तापले आहे. त्यामुळे सभेची तारीखही बदलली आहे.
‘गोकुळ’ दूध संघ सामान्य माणसाच्या घामावर उभा राहिलेला आहे. मल्टिस्टेट केल्याने जिल्हा संघाचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे संघ संचालकांनी याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात ‘गोकुळ’चे मोलाचे योगदान आहे. दूध उत्पादकांच्या घामाला चांगला भाव मिळून त्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती व्हावी, या हेतूने संघाची निर्मिती झाली. आनंदराव पाटील-चुयेकर व अरुण नरके यांचे संघाच्या उभारणीतील योगदान कोणीही नाकारू शकत नाही. त्यात उत्पादकांनी दर्जेदार दूधपुरवठा करून बहुमोल वाटा उचलला आहे. राज्य सरकारने शासकीय दूध डेअरीच्या सर्व मालमत्ता ‘गोकुळ’कडे वर्ग केल्याने संघाला अधिक वेगाने झेप घेता आली. आज देशात सहकारी दूध संस्थांमध्ये ‘गोकुळ’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, याचा आम्हाला अभिमान आहे. मी आपल्या संघाचा सभासद नाही; पण अनेक वर्षे राज्यातील शेतकºयांचे नेतृत्व करतो. चांगली चालणारी संस्था मोडकळीस निघावी, अशा हेतूने मी कधीही आंदोलने केली नाहीत. संचालक मंडळाने ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याचे ठरविले आहे, हे योग्य नाही. यामुळे जिल्हा दूध संघाचा दर्जा राहणार नाही. त्याचबरोबर ‘गोकुळ’ला मिळालेली मालमत्ता जिल्हा दूध संघ म्हणून मिळाली आहे. जर जिल्हा दूध संघ राहणार नसेल तर सरकारची मालमत्ता परत देणार का? हा प्रश्न उपस्थित होतो.
स्वाभिमानासाठी ‘मल्टिस्टेट’ला गाडा
‘गोकुळ’ कोल्हापूरची अस्मिता असून, राजकीय स्वार्थासाठी मल्टिस्टेट करण्याचा घाट घातला आहे. सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हक्कावर गदा येणार आहे. कोल्हापूरचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी मल्टिस्टेटचे भूत गाडून टाका, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटला विरोध करण्यासाठी चंद्रदीप नरके यांच्या गटाच्या करवीर विधानसभा मतदारसंघातील दूध संस्था प्रतिनिधींचा मेळावा रविवारी अमृतसिद्धी हॉल, कळंबा येथे आयोजित केला होता. त्यामध्ये ते बोलत होते.
आमदार नरके म्हणाले, अरुण नरके कार्यरत असल्याने आतापर्यंत ‘गोकुळ’मध्ये कधी लक्ष घातले नाही. सगळ्याच संस्थांत आपण भाग घेणे उचित नसल्याने आपण इकडे तिकडे केले नाही. ‘गोकुळ’वर सामान्य माणसाच्या संसाराचा डोलारा उभा आहे. संचालकांच्या निर्णयाने सामान्य माणसांवर अन्याय होत असेल, तर त्याविरोधात उघड भूमिका घ्यावीच लागणार आहे. दूध पुरवठा करणाºया प्रत्येक संस्थेला सभासद करून घेतले पाहिजे; पण विरोधी गटाच्या संस्थांना सभासद करून घेतले नाही. एवढेच नव्हे त्यांचे वासाचे दूध काढले जाते. एवढी दादागिरी सुरू आहे. आतापर्यंत सहन केले, उत्पादकांच्या मुळावर कोणी उठणार असेल, तर त्याला विरोधास आपण पुढे राहू.
सहा संचालकांचे नेते मूग गिळून
गप्प कसे ? : चंद्रदीप नरके
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालकांनी मल्टिस्टेटचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादक व संस्थाचालक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत किमान महादेवराव महाडिक काहीतरी बोलत असतात; पण सहा संचालक असलेले दुसरे नेते मात्र मूग गिळून गप्प का? असा सवाल करीत विधानसभा निवडणुकीची आपणाला काळजी नसून, सामान्य माणूस माझ्या पाठीशी आहे. ‘गोकुळ’मधील रसद बंद झाली की विधानसभा अधिक सोपी होईल, अशी टीका आमदार चंद्रदीप नरके यांनी पी. एन. पाटील यांचे नाव न घेता केली.
‘गोकुळ’ मल्टिस्टेटला विरोध करण्यासाठी चंद्रदीप नरके यांच्या गटाचा करवीर मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा अमृतसिद्धी, कळंबा येथे झाला. यावेळी नरके यांनी चौफेर फटकेबाजी करीत ‘गोकुळ’बरोबरच ‘कुंभी’तील विरोधकांवर हल्ला चढविला.
आमदार नरके म्हणाले, ‘गोकुळ’च्या विरोधात बोलणाºयांचे दूध जप्त केले जाते, इतकी दहशत संचालकांची आहे. सभेत संस्था प्रतिनिधींना बोलू दिले जात नाही, त्यांना मारहाण केली जाते. ‘गोकुळ’ दूध संघ कोणाची जहागीरदारी नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने आतापर्यंत अनेकांना डोक्यावर घेतले; पण नंतर ती पायांखालीही घेते, याचे भान ठेवावे. साखरेचा दर २४०० रुपयांपर्यंत आल्यानंतरही कर्जेे काढा; पण एफआरपीप्रमाणे पैसे देण्यासाठी आग्रह धरणारी मंडळी ‘गोकुळ’मध्ये का गप्प आहेत?
मी लोकशाही मार्गाने जाणारा लोकप्रतिनिधी असल्याने साखर कारखान्याच्या शेतकºयांनी कितीही प्रश्न उपस्थित केले तरी संयमाने उत्तरे देतो. कोणाच्या अंगावर जात नाही. परवा ज्येष्ठ सभासदाबाबत ‘गोकुळ’च्या सभेत घडलेला प्रकार निश्चितच निंदनीय आहे.