विद्यापीठात ‘श्रेय नामावली’वरून राजकारण
By admin | Published: January 5, 2016 01:09 AM2016-01-05T01:09:43+5:302016-01-05T01:09:43+5:30
लोकमत हेल्पलाईन न्यूज : वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालयातील प्रकार, काही महिन्यांपासून फलक कागदाने झाकला
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामधील वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालयाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे दर्शविणारा ‘श्रेय नामावलीचा’ फलक झाकून ठेवण्याचा प्रकार घडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा फलक कागदाने झाकून ठेवण्यात आला आहे.
विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषाभवनमधील या संग्रहालयातील संबंधित फलक झाकून ठेवल्याची माहिती एका वाचकाने ‘लोकमत हेल्पलाईन’वर दिली. त्यानुसार या फलकाबाबतची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने जाणून घेतली. संग्रहालयाच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे दर्शविणारा श्रेय नामावलीचा फलक संग्रहालयाच्या प्रवेशद्वारातून आत जाताना उजव्या बाजूला लावला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संबंधित फलक हा कागद लावून झाकण्यात आला आहे. या फलकावर ‘डॉ. सुनीलकुमार लवटे (संशोधन, साधन संग्राहक), पं. ना. पोतदार (वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ), विजय गजबर (आर्किटेक्ट) आणि संग्रहालय उभारणीत योगदान देणाऱ्या अन्य व्यक्तींसह खांडेकर कुटुंबीय’ असा उल्लेख आहे. योगदान देणाऱ्यांना त्यांचे श्रेय देण्याऐवजी हा फलक झाकून ठेवून संबधितांना काय साध्य करावयाचे आहे, असा सवाल काही जणांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान, झाकून ठेवलेल्या या फलकाबाबत संग्रहालयाच्या संचालक डॉ. पद्मा पाटील यांना विचारले असता त्या म्हणाल्या, संग्रहालयातील विविध छायाचित्रे, वस्तूंची माहिती देणारे फलक मराठी भाषेत आहेत. ‘नॅक’ समितीने भेट दिल्यानंतर हे फलक मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेत लावण्यात यावेत अशी सूचना केली. त्यानुसार छायाचित्रे, वस्तू आदींची संबंधित तीन भाषांमध्ये माहिती देणारे फलक बनविले आहेत. अशा पद्धतीने ‘श्रेय नामावली’चा फलक बनविला जाणार आहे शिवाय संग्रहालयातील काही भागाची डागडुजी, रंगरंगोटीचे काम केले जाणार आहे. हे काम झाल्यानंतर सर्व फलक विद्यापीठ प्रशासनाच्या सूचनेनुसार लावण्यात येईल. जाणीवपूर्वक श्रेय नामावलीचा फलक झाकून ठेवलेला नाही.(प्रतिनिधी)
श्रेय नामावली झाकणे निषेधार्ह
वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालय मी सन २००० ते २०००४ या कालावधीत अविश्रांत श्रम, संशोधन करून, साधने जमवून उभा केले आहे. या कार्याबद्दल विद्यापीठाने मानधन देऊ करून देखील मी घेतले नाही. त्यानंतर सुमारे दहा वर्षे संग्रहालयाचे संचालक म्हणून कार्य केले. वि. स. खांडेकर आणि विद्यापीठ यांच्याबद्दल असलेल्या कृतज्ञतेमुळे मानधन घेतले नाही. अशा पार्श्वभूमीवर श्रेय नामावली महिनों-महिने झाकणे अयोग्य असल्याचे मत, संग्रहालयाचे निर्माते आणि माजी संचालक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, श्रेय नामावली झाकणाऱ्यांचे हेतू स्वच्छ दिसत नाही. माझी याबद्दल खात्री आहे की, श्रेय नामावली झाकण्याचे काम संबंधितांनी कुलगुरू, कुलसचिव, बीसीयुडी यांना अंधारात ठेवून केले आहे. संग्रहालयाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांची नावे अशा पद्धतीने झाकणे हे निषेधार्ह आहे.
नवा फलक जरूर लावा; पण...
श्रेय नामावलीचा नवा फलक जरूर करावा परंतु; त्यासाठी सध्याचा फलक कागदाने झाकून ठेवण्याची गरज नव्हती. जेव्हा नवा फलक लागेल तेव्हा जुना काढून ठेवता येईल मात्र याठिकाणी तसे घडलेले नाही.