‘गोकुळ’चे राजकारण : डोंगळे, रणजित पाटील हे पर्याय शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 10:42 AM2018-12-07T10:42:40+5:302018-12-07T10:46:11+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या ( गोकुळ ) अध्यक्ष बदलाचे वारे वाहत असले तरी मुळात बदल होणार ...

 Politics of Gokul: Dongle, Ranjeet Patil are the possible options | ‘गोकुळ’चे राजकारण : डोंगळे, रणजित पाटील हे पर्याय शक्य

‘गोकुळ’चे राजकारण : डोंगळे, रणजित पाटील हे पर्याय शक्य

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘गोकुळ’चे राजकारण : डोंगळे, रणजित पाटील हे पर्याय शक्यअध्यक्ष बदल होणार का हाच कळीचा प्रश्र्न 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष बदलाचे वारे वाहत असले तरी मुळात बदल होणार का व झाला तर संधी कुणाला याभोवती सध्या संघाचे राजकारण फिरत आहे.

संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी १४ डिसेंबरला त्यासाठी बैठक बोलवली असली तरी त्यातून कांही निर्णय होण्याची शक्यता धूसर आहे. ज्यांना बदल हवा आहे त्यांनीही बदल करा, नाहीतर नाही म्हणून तरी सांगा अशी भूमिका घेत बदलाच्या मागणीतच निम्मी माघार घेतली आहे.

अध्यक्ष विश्र्वास पाटील यांना सलग तीन वर्षे पदाची संधी मिळाली आहे. तिन्ही वर्षे त्यांना संघाची वार्षिक सभा नीट हाताळता आली नाही असा त्यांच्यावर मुख्य आक्षेप आहे. त्यांना पुरेशी संधी मिळाल्याने बदल करण्यात यावा अशी मागणी पुढे आली आहे.
ती करण्यात अरुण डोंगळे, रणजित पाटील,रविंद्र आपटे यांचा पुढाकार आहे.

अध्यक्ष पाटील हे करवीर विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक होईपर्यंत त्यांच्याकडेच अध्यक्षपद राहावे यासाठी पी. एन. पाटील आग्रही राहू शकतात.

तालुक्याच्या राजकारणात ते नरके गटाचे विरोधक आहेत ही देखील त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे पी. एन. यांचा पहिला प्रयत्न अध्यक्ष बदल विधानसभा निवडणूकीनंतरच करु असाच राहील. परंतू त्यातूनही संचालकांतून फारच आग्रह झाला तर त्यासाठी अरुण डोंगळे व रणजित पाटील यांचा विचार होवू शकतो.

अरुण डोंगळे आक्रमक आहेत. भोगावती कारखान्यांत ते पी. एन. पाटील यांच्यासोबत आहेत. शिवाय विधानसभा निवडणूकीतही त्यांचा उपयोग होवू शकतो. डोंगळे यांच्या नांवास महाडिक कितपत तयार होतात हे महत्वाचे आहे. रविंद्र आपटे हे दोन्ही नेत्यांना चालणारे संचालक आहेत परंतू त्यांची प्रकृती साथ देत नसल्याचे सांगण्यात येते.

रणजित पाटील हे देखील प्रबळ दावेदार आहेत. ते दोन्ही घाटगे गटांना चालू शकतात. आगामी लोकसभा निवडणूकीत बेरजेचे राजकारण करून कागल तालुक्यांतून मदत मिळावी यासाठी दोन्ही घाटगे गटात समझोता घडवून आणण्यासाठी महाडिक प्रयत्नशील आहेत. त्याचा भाग म्हणून अंबरिश घाटगे यांना गोकुळमध्ये संधी देवून समरजित घाटगे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा केला जाण्याचीही एक शक्यता आहे.

लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर, तर विधानसभा आठ महिन्यांवर आल्याने त्या अनुषंगाने नेत्यांना सोईचा होईल असाच अध्यक्ष निवडण्याला प्राधान्य असेल. इच्छुक म्हणून पुढे आलेली नावे ही महाडिक व पी.एन यांच्या परस्परविरोधी असल्याने त्यात कसे एकमत होणार हाच कळीचा प्रश्र्न आहे. सद्यस्थितीत महाडिक हे पी.एन.यांना डावलून कांही करण्याची शक्यता नाही. जे कांही होईल ते दोघांच्या संमतीनेच असे आजचे चित्र आहे.

बदल करायचा की नाही याचा कोणताही निर्णय या क्षणाला आम्ही घेतलेला नाही. मी व पी.एन.पाटील १४ तारखेला एकत्र बसू व त्यानंतरच याचा निर्णय होईल. युध्दाला सामोरे गेल्यावर समोरच्याला गोळी घालायची की तेथून पळून यायचे हे त्यावेळी ठरवायचे अशी महाडिक यांची कार्यपध्दती आहे.
महादेवराव महाडिक
गोकुळचे नेते

अगोदर नेत्यांची चर्चा

येत्या १४ तारखेला दुपारी १२ वाजता संघाच्या ताराबाई पार्कातील मुख्यालयात अगोदर महाडिक व पी.एन. हे दोघेच एकत्र बसणार आहेत. त्यानंतर मग संचालकांशी चर्चा केली जाणार आहे. मते आजमावून घेण्याची पध्दत संघात नाही. त्यामुळे संचालक सांगतील ते नेते ऐकून घेतील व जो निर्णय देतील त्यानुसार घडेल. संघात बंड वगैरे कधी होत नाही ते गेल्या तीस वर्षात झालेले नाही व यापुढेही होणार नाही असे महाडिक यांचे म्हणणे आहे.
 

Web Title:  Politics of Gokul: Dongle, Ranjeet Patil are the possible options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.