कुरघोडीच्या राजकारणातून एकमेकांना शड्डू
By admin | Published: June 5, 2015 11:47 PM2015-06-05T23:47:51+5:302015-06-06T00:24:21+5:30
ऊसदर प्रश्न : राष्ट्रवादी-भाजप आज आमने-सामने; ऊस हंगाम संपल्यावर राजकीय गुऱ्हाळ
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढणे हा आमचा हक्क असून, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. जर मुस्कटदाबी करून आणि पोलिसी बळाचा वापर करून मोर्चाला विरोध केलाच, तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही मागे हटणार नाही. वीस हजार शेतकऱ्यांना अटक होईल; पण मोर्चा हा काढणारच, असा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शुुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. ‘एफआरपी’ची रक्कम देण्यासाठी जाहीर केलेले दोन हजार कोटी रुपये साखर कारखान्यांना द्यावेत, या मागणीसाठी आज, शनिवारी पालकमंत्री तथा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्धार राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे; तर मंत्र्यांच्या घरावर ऊठसूट मोर्चा काढण्याची पद्धत मोडून काढण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काहीसा तणावही निर्माण झाला आहे.
कोणा मंत्र्यांना मानसिक त्रास देण्याचा आमचा हेतू नाही; परंतु जाहीर केलेली दोन हजार कोटींची मदत ३१ मेपर्यंत देण्याचे आश्वासन देऊन, माझ्या घरावर मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही आणि तशी वेळ आलीच तर चहा-नाष्टा देऊन पाठवू, असे पालकमंत्री पाटील यांनी आम्हाला सांगितले होते. त्यामुळेच आम्ही त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, असे आमदार मुश्रीफ म्हणाले.
मोर्चा काढणार म्हटल्यावर मुस्कटदाबीचा प्रयत्न होत आहे. पोलिसांकरवी दबाव आणला जात आहे. आम्हाला अटक होण्याची भीती नाही. महात्मा गांधींना अटक झाली; पण त्यांचा स्वातंत्र्याचा लढा सुरूच राहिला. उद्या आम्हाला अटक झाली किंवा मोर्चा काढू दिला नाही तर आमचे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मोर्चा शांततेत असेल. आमचा पक्ष सुसंस्कृत आहे. कोठेही गालबोट लागणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतली आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
बैठकीत अनेक नेत्यांनी पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, माजी आमदार के. पी. पाटील, आर. के. पोवार, निवेदिता माने, बाबासाहेब पाटील, भैया माने, आदिल फरास यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुस्कटदाबीला घाबरत नाही : मुश्रीफ
साखर हंगाम संपला आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये राजकीय वर्चस्वाचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. राज्य शासनाने ऊस उत्पादकांसाठी जाहीर केलेले दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज तातडीने द्यावे या मागणीसाठी राष्ट्रवादीने मोर्चाची हाक दिली आहे. त्यासाठी त्यांना सहकारमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढायचा आहे. मोर्चा घरावर नको, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढा म्हणून भाजपने त्यास विरोध केला आहे. जिल्ह्याच्या इतिहासात हे दोन पक्ष प्रथमच आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे आज, शनिवारी नेमके काय होणार याबद्दल लोकांत प्रचंड उत्सुकता आहे.
महाडिक गटाची कोंडी
खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत, तर त्यांचे चुलतभाऊ अमल हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे महाडिक यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. मोर्चा अडवायला कुणी जायचे व मोर्चा काढायला कुणी जायचे, अशी स्थिती तयार झाली आहे. शुक्रवारी दिवसभर कार्यकर्त्यांत तीच चर्चा सुरू होती.
मोर्चा रोखण्यावर भाजप कार्यकर्ते ठाम
एखाद्या प्रश्नाचे निमित्त करून वारंवार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याची पद्धत शनिवारी भाजपचे कार्यकर्ते मोडून काढतील. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने जर मोर्चा काढला, तर तो आम्ही रोखणारच, असा इशारा भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी पुन्हा एकदा दिला. पालकमंत्र्यांच्या घराच्या शंभर मीटर परिसरातही मोर्चा येऊ दिला जाणार नाही. जर राष्ट्रवादीच्या नेत्यांना निवेदनच द्यायचे असेल तर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्र्यांना भेटायला यावे. जर मोर्चाच काढायचा असेल, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढावा, असे जाधव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शहरातील तसेच शहर परिसरातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना शनिवारी सकाळी दहा वाजता पालकमंत्री पाटील यांच्या नाळे कॉलनी येथील घरासमोर जमण्यास सांगण्यात आले आहे. जास्तीत जास्त कार्यकर्ते कसे येतील या दृष्टीने व्यूहरचना करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
उपअधीक्षकांनी समजावले
शहर पोलीस उपअधीक्षक
भारतकुमार राणे, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक देशमुख यांनी भाजपचे महेश जाधव, रामभाऊ चव्हाण, अशोक देसाई, सुरेश जरग, आदींशी चर्चा केली. तुमच्या वर्तणुकीमुळे कसलेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले. त्यावेळी मोर्चा काढणार नाही. दादांच्या घराच्या आवारात फक्त कार्यकर्ते जमतील. कसलीही दहशत निर्माण करणार नाही किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वर्तन होणार नाही, अशी हमी कार्यकर्त्यांनी दिली.
मोर्चा, मेळाव्याची जय्यत तयारी
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने शनिवारच्या मेळाव्यात व त्यानंतर निघणाऱ्या मोर्चात किमान वीस हजार शेतकरी सहभागी होतील, असे सांगण्यात आले. मेळाव्यासाठी बाबा जरगनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर निर्माण चौकालगत असलेल्या मैदानावर मंडप व व्यासपीठ उभारले आहे. तेथे ध्वनिक्षेपक यंत्रणा उभी केली आहे. मोर्चात हलगी, वाद्ये व काही मोजकी वाहने आणली जाणार आहेत. दुपारी बारा वाजता मेळाव्यास सुरुवात होईल, तर दोन वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे.
शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीएवढी रक्कम देण्यासाठी सरकारने जाहीर केलेली दोन हजार कोटींची रक्कम उपलब्ध करून द्यावी म्हणून शेतकऱ्यांचा मोर्चा आपल्या घरावर येणार आहे. त्याचा आदर करत आपण मोर्चेकऱ्यांच्यावतीने निवेदन स्वीकारण्यास जाणार आहोत.
- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री
पोलिसांचा प्रयत्न अयशस्वी
शुक्रवारी दुपारी चार वाजता खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आदींनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन मोर्चा नाकारल्याबद्दल जाब विचारला. पालकमंत्र्यांच्या दबावाखाली तुम्ही काम करीत आहात, असा आरोप मुश्रीफ यांनी केला. काहीही गोंधळ होणार नाही याची आम्ही हमी देतो, असे मुश्रीफ यांनी सांगितले; परंतु मोर्चा घरावर न नेता निवेदन स्वीकारण्यासाठी पालकमंत्री पाटील यांना विनंती केली जाईल, असे डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले. मात्र, मोर्चा व मेळाव्यास परवानगी देण्यास त्यांनी नकार दिला.