महापालिकेत राजकारण पेटले--आक्रमक ‘कदम’ रोखण्यासाठीच खेळी

By Admin | Published: August 6, 2016 12:02 AM2016-08-06T00:02:22+5:302016-08-06T00:23:06+5:30

महापौर कक्षात सत्ताधारी-विरोधक भिडले : सुनील कदम यांना रोखण्यासाठी सभा तहकुबीचा आरोप; प्रचंड गोधळ

Politics in municipal corporation - only to prevent aggressive 'steps' | महापालिकेत राजकारण पेटले--आक्रमक ‘कदम’ रोखण्यासाठीच खेळी

महापालिकेत राजकारण पेटले--आक्रमक ‘कदम’ रोखण्यासाठीच खेळी

googlenewsNext

कोल्हापूर : ‘मी नेता आहे पार्टीचा; कोण हे रामाणेसाहेब? कोण हे मास्तर? त्यांना कोणी दिला अधिकार सभा रद्द करण्याचा? त्यांचा काय संबंध?’ असा जाब विचारीत शुक्रवारी महापालिकेत सुमारे तीन तास सत्ताधारी आणि विरोधी आघाडी यांच्यात रणकंदन माजले. महानगरपालिकेत विशेष सभा तहकूब केल्याच्या कारणावरून खड्या आवाजात बोलण्याचा व एकमेकांना धमकावण्याचा प्रकार महापौर कक्षात घडल्याने महापालिकेत काही काळ वातावरण तंग बनले होते.
‘केएमटी’ला अर्थसाहाय्य करण्याच्या विषयासाठी शुक्रवारी बोलाविलेली विशेष सभा महापौर अश्विनी रामाणे यांनी ‘वेळेवर’ येऊन कोरमअभावी तहकूब केली. सभागृहात ताराराणी-भाजप आघाडीचेच फक्त सदस्य होते. तहकुबीच्या घोषणेनंतर पाचच मिनिटांत सुनील कदम सभागृहात आले. आयुक्तांसह कोणीच अधिकारी सभेस नसल्याने तसेच किती वेळेसाठी सभा तहकूब केली याची घोषणा न झाल्याने सर्व सदस्य सभागृहातच थांबून राहिले. दरम्यान महापौर रामाणे आपल्या दालनात गेल्या. दीड तास सभागृहात बसल्यानंतर सर्व सदस्यांनी पुन्हा सभा घ्यावी; महापौरांनी बेकायदेशीरपणे सभा तहकूब केल्याचा आरोप करीत गोंधळ घातला. ताराराणी-भाजप आघाडीच्या सदस्यांनी महापौर कक्षात जाऊन महापौर अश्विनी रामाणे यांना सभा तहकूब केल्याबाबत जाब विचारला. त्यावेळी त्यांनी, नियमानुसार कोरमअभावी सभा तहकूब केल्याचे सांगितले; पण ही सभा बेकायदेशीरपणे तहकूब केल्याचा आरोप सुनील कदम यांनी केला. त्यावरून गोंधळ उडाला. ‘तू कोण, तुमचा संबंध काय, तुम्हाला कोणी अधिकार दिला?’ अशा भाषेत एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत प्रकार घडत होते. त्यावेळी ‘स्थायी’चे सभापती मुरलीधर जाधव, प्रा. जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, सभागृह नेते प्रवीण केसरकर यांनी कदम यांना समजावण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेता संभाजी जाधव यांनीही महापौर रामाणे यांना जाब विचारला. कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नावर दोन्हीही संघटनांत संघर्ष चिघळू नये यासाठी सभा तहकूब करण्याचे ठरले होते. त्याबाबत सर्वांना निरोप दिल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. पण राजकीय षड्यंत्र रचून कदम यांना विरोध म्हणून ही सभा तहकूब केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला. तासभर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, गोंधळ सुरू होता.
ताराराणी-भाजपच्या सर्व सदस्यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या दालनात जाऊन त्यांना ही सभा बेकायदेशीरपणे तहकूब केल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. नगरसचिवांवर दबाव आणून सभा गुंडाळल्याचा आरोप केला. ही सभा बेकायदेशीर ठरवावी, आम्ही समांतर सभा घेऊ, प्रसंगी सर्व सदस्य राजीनामे देऊ, असा इशारा त्यांनी दिला.


पुन्हा २० रोजी सभा--शुक्रवारी तहकूब झालेली सभा पुन्हा २० आॅगस्ट रोजी घेत असल्याचे पत्रक महापौर रामाणे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले.

आक्रमक ‘कदम’ रोखण्यासाठीच खेळी
कोल्हापूर : गेल्या वर्षभरात प्रत्येक वेळी तास-दीड तास उशिरा सुरू होणारी महानगरपालिकेची सभा वेळेवर घेण्याचा साक्षात्कार शुक्रवारी अचानक महापौर अश्विनी रामाणे यांना झाला. त्यामुळे उशिरा सभेची सवय लागलेले सदस्य येण्यापूर्वीच वेळेवर सभा सुरू करून ती घाईगडबडीत कोरमअभावी तहकूब करण्याचीही घटना घडली.
विशेष म्हणजे, सभेसाठी हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत सदस्य व फक्त नगरसचिव उपस्थित होते. आयुक्तही त्यांच्या दालनातून सभागृहात प्रवेश करीपर्यंत त्यांना सभा संपल्याचा निरोप आला. कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वीकृत सदस्य सुनील कदम यांचा सभागृहातील प्रवेश कसा लांबणीवर टाकता येईल, हा डाव सत्ताधाऱ्यांकडून खेळल्याचे यावरून स्पष्ट झाले.
या सभेत ‘केएमटी’कडील कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी व विमा रक्कम देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. तसेच माजी महापौर सुनील कदम यांच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाल्याने ते या सभेत उपस्थित राहणार होते. पण तत्पूर्वी, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही प्रथम आमची देणी द्या; मग दुसऱ्यांचे भागवा, अशी विनंती केली होती. या प्रश्नावरून गुरुवारी (दि. ४) सायंकाळी दोन्हीही संघटनेच्या नेत्यांशी सत्तारूढ आणि विरोधी आघाडीतील पदाधिकारी चर्चेत होते; पण कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सभा तहकूब करण्याचे षड्यंत्र करून कदम यांचा सभागृह प्रवेश लांबणीवर टाकण्याची खेळी खेळली गेली.
सकाळी ११.०५ वाजता महापौर रामाणे सभागृहात आल्या. त्यांनी ‘वंदे मातरम्’ म्हटले आणि कोरम नसल्याचे सांगून सभा तहकूब करून त्या क्षणातच डायसवरून उतरल्या. त्यावेळी सभागृहात ताराराणी-भाजप आघाडीचे अवघे वीस सदस्य यांच्यासह फक्त नगरसचिव दिवाकार कारंडे आणि दोनपैकी एकच स्टेनो उपस्थित होते. गटनेते सत्यजित कदम यांनी महापौर रामाणे यांना महत्त्वाच्या प्रश्नांसाठी विशेष सभा बोलविली आहे, सभा तहकूब करू नये, अशी विनंती केली; पण महापौरांनी ही विनंती धुडकावत सभागृह सोडले.

Web Title: Politics in municipal corporation - only to prevent aggressive 'steps'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.